सलग दुसऱ्या वर्षी पृथ्वी बर्वे आंतरराष्ट्रीय स्पर्धेत चमकली
विटा प्रतिनिधी
जॉर्डन देशाची राजधानी अम्मान येथे आयोजित केल्या गेलेल्या अल- वतानी पॅरा टेबल टेनिस फॅक्टर 20 या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताच्या पृथ्वी बर्वे हिने दोन रौप्य पदकांची कमाई केली. दिनांक 31 मे ते 3 जून २०२३ दरम्यान या स्पर्धा पार पडल्या. तिच्या यशाचे कौतुक होत आहे.
स्पर्धेतील महिला एकल मध्ये पहिल्या फेरीत भारताच्या देवयानी वाल्हे हिचा 3 -1 असा पराभव केला. तर दुसऱ्या फेरीत भारताच्या च महेक कौर हिचा 3-0 असा पराभव केला, तर तिसऱ्या सुवर्ण पदकाच्या झालेल्या सामन्यात मात्र अटीतटीच्या सामन्यात पृथ्वी ला सहाना रवी कडून 3 – 0 असा पराभव स्वीकारावा लागला. या स्पर्धेच्या महिला एकल गटात पृथ्वीने रौप्य पदक मिळवले. मिक्स डबल्स मध्ये पृथ्वी बर्वे हिने तिचा साथीदार दिल्लीचा कुणाल आरोराच्या साथीने दुसरे रौप्य पदक पटकावले.
मिक्स डबल्स मधील पहिल्या फेरीत भारताच्या भावना कुकडिया/ वाय नितेश या जोडीला 3-0 अशी मात दिली तर दुसऱ्या फेरीत केन्ट इयान ( कॅनडा) /अब्दलेलाझिझ समालाह (इजिप्त) या जोडीचा 3-0 असा पराभव केला.
सुवर्ण पदकाच्या मॅच मध्ये मात्र अल सनेह अली (कुवेत)/ मार्चेव्हा व्हॅलेंतीना ( बल्गेरिया) या जोडीकडून अतिशय अवघड मॅच मध्ये पराभव झाला.
सलग दुसऱ्या वर्षी पृथ्वी बर्वे हिने अल – वतानी पॅरा टेबल टेनिस फॅक्टर 20 या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारतीय संघाकडून खेळताना रौप्य पदकाची कमी केली. गत वर्षी पदार्पणातच पृथ्वीने या स्पर्धेत १ सुवर्ण व १ रौप्य पदक मिळविले होते. यंदाच्या स्पर्धेत महाराष्ट्र राज्यातून सहभागी झालेली पृथ्वी बर्वे हि एकमेव खेळाडू होती.
पृथ्वी बर्वे ही विटा येथील कृषी तज्ञ जयंत तथा बाबा बर्वे यांची नात तसेच नेचर केअर फर्टिलायझर्सचे कार्यकारी संचालक जयदेव बर्वे व बरवा स्कीन थेरपीच्या संचालिका कामाक्षी बर्वे यांची कन्या आहे. लहानपणापासूनच तिला वाचनाची व खेळाची आवड आहे. टेबल टेनिसचे प्राथमिक धडे सातारा येथे गिरवल्यानंतर गेली 4 वर्ष पुण्याच्या शारदा स्पोर्ट्स सेंटर मध्ये शप्रशिक्षक सुरेंद्र देशपांडे आणि दीप्ती चाफेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. या स्पर्धसाठी भारताच्या पॅरा टेबल टेनिस असोसिएशन चे सेक्रेटरी प्रमोद गंग्राडे, टीम कोच श्रीमती सुमन पारेख, SAI चे कोच सेल्वंम, प्रेम हे खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी चारही दिवस उपस्थित होते .
महाराष्ट्र टेबल टेनिस असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण लुंकड, उपाध्यक्ष आशिष बोड, सेक्रेटरी यतीन टिपणीस राजीव बोडस, स्मिता बोडस , प्रकाश तुळपुळे व पुणे जिल्हा टेबल टेनिसच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी पृथ्वी बर्वेच्या या यशाबद्दल तिचे कौतुक केले.