बेळगाव : भेदक गोलंदाजी व संयमी फलंदाजीच्या जोरावर अटीतटीच्या अंतिम लढतीत केआर शेट्टी किंग्ज संघाने स्पोर्ट्स ऑन संघाचा 5 गड्यांनी पराभव करुन बेळगाव प्रिमियर लिग चषक पटकाविला. मदन बेळगावकर याला मालिकावीर तर विशाल गौरगौंडाला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. एसकेईच्या प्लॅटिनम ज्युबिली मैदानावर खेळविण्यात आलेल्या अंतिम सामन्यात स्पोर्ट्स ऑन संघाने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकात 8 गडी बाद 34 धावा केल्या. त्यात मैफूज दफेदारने 3 चौकारांसह 10 तर अभिषेक देसाईने 8 धावा केल्या. केआर शेट्टीतर्फे मदन बेळगावकरने 11 धावात 3, करण बोकडेने 5 धावात 2 तर विशाल गौरगौंडाने 7 धावात 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना केआर शेट्टी संघाने 7.3 षटकात 5 बाद 35 धावा करुन सामना 5 गड्यांनी जिंकला. त्यात विशाल गौरगौंडाने संयम राखून फलंदाजी करत 10 धावा तर किरण तारळेकरने नाबाद 6 धावा केल्या. शेवटच्या षटकापर्यंत सामना दोन्ही बाजूने झुकला होता. त्यामुळे या सामन्याचा आनंद क्रिकेट प्रेमींनी घेतला. स्पोर्ट्स ऑनतर्फे कर्णधार संतोष सुळगे-पाटीलने 7 धावात 2, सादिक तिगडीने 9 धावात 2 तर राजू मुजावरने 1 गडी बाद केला. सामन्यानंतर प्रमुख पाहुणे म्हणून एसकेई सोसायटीचे चेअरमन व तरुण भारतचे सल्लागार संपादक किरण ठाकुर, एसकेई सोसायटीचे संचालक व प्लॅटिनम ज्युबिली मैदानाचे अध्यक्ष ज्येष्ठ क्रिकेटपटू आनंद सराफ, विश्रृतचे सीईओ चंदन कुंदरनाड, सेलिब्रेशन इव्हेन्टचे संस्थापक अमरदीप पाटील, शिवप्रतिष्ठान बेळगावचे अध्यक्ष किरण गावडे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
सुसज्ज मैदानावर आयपीएलच्या धर्तीवर केआर शेट्टी स्पर्धा : प्रणय शेट्टी
एसकेई सोसायटीने बेळगावातील होतकरु क्रिकेटपटूंना खेळण्यासाठी सुसज्ज असे मैदान बनवून एक संधी मिळवून दिली आहे. बेळगावच्या क्रिकेटपटूंमध्ये कौशल्य आहे. यापूर्वी युनियन जिमखाना मैदानावर आयपीएलच्या धर्तीवर केआर शेट्टी चषक टी-20 क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. पुढील मोसमात या मैदानावर केआर शेट्टी चषक टी-20 क्रिकेट स्पर्धा मोठ्या प्रमाणात आयोजित केली जाणार आहे. अशा स्पर्धा या मैदानावर आयोजित करुन बेळगावातील प्रतिभाशाली क्रिकेटपटूंना संधी द्यावी व या मैदानावर जास्तीत जास्त स्पर्धा भरवून क्रिकेटपटूंना प्रोत्साहन द्यावे, असे प्रणय शेट्टी म्हणाले. यावेळी पाहुण्याच्या हस्ते विजेत्या केआर शेट्टी किंग्ज व उपविजेत्या स्पोर्ट्स ऑन संघाला आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले. अंतिम सामन्यातील सामनावीर विशाल गौरगौंडा (केआर शेट्टी), उत्कृष्ट फलंदाज संतोष सुळगे-पाटील (स्पोर्ट्स ऑन), उत्कृष्ट गोलंदाज करण बोकडे (केआर शेट्टी), इम्पॅक्ट खेळाडू तनिष्क नाईक (साई इंडियन बॉईज हिंडलगा), उत्कृष्ट झेल अभिषेक देसाई (स्पोर्ट्स ऑन), सर्वाधिक षटकार मैफूज दफेदार (स्पोर्ट्स ऑन) तर मालिकावीर मदन बेळगावकर (केआर शेट्टी) यांना चषक व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. पंच म्हणून सागर कोलेकर व सुनील मासेकर, ऑनलाइन स्कोरर म्हणून सुजीत शिंदोळकर यांनी काम पाहिले. स्पर्धेचे समालोचक प्रकाश पाटील, आरीफ बाळेकुंद्री, बंटी असलकर यांनी केले. तर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अर्जुन स्पोर्ट्सचे संचालक परशराम पाटील, विवेक पाटील, बाळकृष्ण पाटील, मिलिंद चव्हाण, सचिन साळुंखे, प्रसाद नाकाडी, गजानन जैनोजी यांनी विशेष परिश्रम घेतले.
बेळगावकरांना पुढील क्रिकेट मोसमात सुसज्ज मैदान : किरण ठाकुर
एसकेई सोसायटीच्या प्लॅटिनम ज्युबिली नूतन मैदानावर प्रथमच बेळगाव प्रिमियर लिग टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. हे मैदान पाहून अनेकजण चकित झाले आहेत. जवळपास 22 एकर जमिनीमध्ये हे मैदान उभे करण्यात आले असून पुढील क्रिकेट मोसमात मैदानावर हिरवळ, लेदर बॉल खेळपट्ट्या, टेनिस बॉल खेळपट्ट्या, पॅव्हेलियन, क्रिकेट शौकिनांसाठी गॅलरी, पार्किंग व्यवस्था आदी व्यवस्था करण्यात येणार आहे. पुढील क्रिकेट मोसमापासून बेळगावात लेदर बॉल व टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा मोठ्या प्रमाणात भरवाव्यात त्यासाठी संस्थेतर्फे मदत केली जाणार आहे. या सुसज्ज मैदानाचा बेळगावच्या क्रिकेटपटूंनी आनंद लुटावा व पुढील काळात बेळगावातील होतकरु क्रिकेटपटूनी भारताचे प्रतिनिधित्व करावे, असा विश्वास किरण ठाकुर यांनी व्यक्त केला.