अंडे हा पदार्थ नुसता खाण्याचा नाही तर नेहमीच चर्चेचाही राहिला आहे. अंडे नेहमी खाण्याविषयीच्या जाहिरातीही झळकत असतात. अंडे कच्चे, उकडून किंवा त्याचे विविध पदार्थ करुन, तसेच अन्य पदार्थांमध्ये घालून खाल्ले जाते. तसे ते स्वस्तही असते. कोंबडीच्या अंड्यापासून शहामृगाच्या अंड्यापर्यंत बऱ्याच प्रकारची अंडी खाण्यायोग्य असतात, असे आहार तज्ञांचे सांगणे असते.
ते मोठ्या प्रमाणात खाल्ले जाते, याचे प्रमुख कारण ते वाजवी दरात मिळते हे आहे. पण एखादे अंडे हजारो रुपये किमतीचे असेल तर ते विकत घेतले जाणार नाही. तथापि, ऑस्ट्रेलियात एका अशा अंड्याचा शोध लागला आहे, की ज्याची किंमत शेकडो डॉलर्समध्ये करण्यात आली आहे. या अंड्याचा शोध कोणत्या ऐतिहासिक स्थळी लागला नसून सुपरमार्केटमध्ये लागला आहे. तसेच हे अंडे डायनासोर किंवा तत्सम जीवविषेशाचे नसून कोंबडीचेच आहे. मग त्याची किंमत इतकी कशी, याचे उत्तर असे आहे की हे अंडे अगदी गोल आकारचे आहे.
सहसा अंडे गोल आकाराचे असत नाही. ते लंबवर्तुळाकार असते. पण काही कोटी अंड्यांमधून एखाद्याचाच आकार गोल असतो. या त्याच्या वैशिष्ट्यामुळे त्याला इतकी मोठी किंमत देण्यात आली होती. काही वर्षांपूर्वी असेच गोल अंडे 78 हजार रुपयांना विकले गेले होते. मेलबोर्नच्या सुपरमार्केटमध्ये या अंड्याला अशीच किंमत मिळल्याची माहिती देण्यात आली आहे.