शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्याहस्ते मध्यप्रदेशमधील पांढुर्णा येथे छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. तसेच कमलनाथ यांना पुन्हा मुख्यमंत्री म्हणुन पहायला आवडेल असेही आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. इंडिया या आघाडीचे घटकपक्ष असलेल्या शिवसेना आणि काँग्रेस यांनी प्रथमच मध्यप्रदेशच्या निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर एकाच राजकिय कार्यक्रमासाठी हजेरी लावली.
पुतळा अनावरण समारंभानंतर आदित्य ठाकरे म्हणाले, “आम्ही हे ठिकाण पवित्र मानतो आणि आपल्या देशाला हुकूमशाहीपासून वाचवण्यासाठी शिवाजी महाराजांकडून प्रेरणा घेतो. मध्य प्रदेशात आज बदलाचे वातावरण आहे,” असेही ते म्हणाले.
पांढुर्णा येथील एमपीएल मैदानावर जनतेला संबोधित करताना, आदित्य ठाकरे यांनी मराठीत भाषण केले. ते म्हणाले: “मी कमलनाथ यांना शपथविधी सोहळ्याची वेळ आणि तारीख काय आहे हे विचारण्यासाठी आलो आहे. मला तुम्हाला पुन्हा मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर पाहायचे आहे. मध्य प्रदेश आणि तेथील लोकांच्या फायद्यासाठी मला तुम्हाला तिथे भेटायचे आहे.”
पुढे बोलताना ते म्हणाले, “मी कमलनाथ यांना त्यांच्या शपथविधी सोहळ्याची तारीख आणि वेळ विचारण्यासाठी आलो आहे? मला कमलनाथ यांना पुन्हा मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर पाहायचे आहे. मध्य प्रदेशातील लोकांच्या कामासाठी मला कमलनाथ यांना भेटायचे आहे.” असेही ते म्हणाले. जनतेला संबोधित करताना आदित्य ठाकरे यांनी 2014 पूर्वीच्या आणि आणि आताच्या गॅस, पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींबाबत भाजपवर निशाणा साधला.
महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचा घटकपक्ष असलेला काँग्रेस आणि शिवसेना (ठाकरे गट) मध्यप्रदेशात एकाच व्यासपीठावर दिसण्याची ही पहिलीच वेळ आहे. दोन्हीही पक्ष I.N.D.I.A या आघाडीचा भाग आहेत. कमलनाथ हे पहिल्यांदाच या आघाडीच्या नेत्यासोबत व्यासपीठावर दिसले आहेत. छिंदवाड्याचे खासदार नकुलनाथ हेही व्यासपीठावर उपस्थित होते.
“छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे आज माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या हस्ते मध्य प्रदेशातील पांढुर्णा, छिंदवाडा येथे अनावरण करण्यात आले. या समारंभाला उपस्थित राहून छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.” अशी अपडेट ही आदित्य ठाकरे यांनी X (पूर्वीचे ट्विटर) वर दिली आहे.