आरक्षण मागणीच्या महत्वाच्या टप्प्यावर राज्यात आंदोलन तीव्र होत आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झाल्याचे पहायला मिळत आहेत. राज्यभरात काही ठिकाणी नेत्यांच्या गाड्यांची तोडफोड करण्यात येत आहे. तरीही काही ठिकाणी शांततेत आंदोलन चालु ठेवण्याचे आवाहन नेत्यांकडून करण्यात येत आहे. कोल्हापूरातही शहरी भागासह ग्रामिण भागातही नागरीकांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे.
मराठा आरक्षणासाठी शिवारे येथे एक दिवशीय साखळी उपोषण
संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचा लढा तीव्र होत असताना मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या उपोषणाला संपूर्ण महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे. सखल मराठ्यांना कुणबी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी अमरण उपोषण सुरु केले. यांच्या अमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी शिवारे तालुका शाहूवाडी येथे एक दिवसाचे साखळी उपोषण बुधवार दिनांक 1 नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आले.
बच्चे सावर्डेत कॅण्डल मार्च : राजकीय नेत्यांना प्रवेश बंदी
बच्चे सावर्डे ता. पन्हाळा येथे मंगळवार दि. ३१ रोजी कॅण्डल मार्च काढण्यात आला याच बरोबर राजकीय नेत्यांना प्रवेश बंदी घालण्यात आली आहे. सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा आरक्षणासाठी आणि मनोज जरांगे – पाटील यांच्या उपोषणाला पांठिबा देणेसाठी गावातील प्रमुख मार्गावरून कॅण्डल मार्च काढण्यात आला. मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यन्त खासदार,आमदार यासह राजकिय नेत्यांना प्रवेश बंदीसह सार्वजनिक बैठका उद्घाटन कार्यक्रम घेणेस, राजकीय फलक लावणेस बंदी घालणेत आलेली आहे.
सकल मराठा समाजाचे पंचगंगा नदीत अर्धनग्न आंदोलन; प्रशासनाच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी
सकल मराठा समाजाने आरक्षणासाठी मंगळवारी सकाळी पंचगंगा नदीत अर्धनग्न आंदोलन केले. यावेळी प्रशासन, गुणरत्न सदावर्ते यांच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे राजेंद्र तोरस्कर यांच्या आमरण उपोषणास पाठिंबा दिला. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाज बांधव मंगळवार 31 रोजी पंचगंगा नदी घाट येथे सकाळी साडेसात वाजता एकत्र आले. यावेळी संयुक्त जुना बुधवार पेठ, पंचगंगा विहार मंडळ यांच्यासह समाज बांधवांनी अर्धनग्न अवस्थेत पंचगंगा नदीत उतरत आंदोलन केले.
मराठा आरक्षणासाठी ताम्रपर्णी नदीत जल आक्रोश
कोवाड (ता.चंदगड) येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी ताम्रपर्णीत जलआक्रोश करण्यात आले. आरक्षण आमच्या हक्काचं…नाही कुणाच्या बापाचं, जय भवानी…जय शिवाजी अशा घोषणा देत कोवाडसह कागणी, किणी येथील मराठा बांधवानी बुधवारी सकाळी ताम्रपर्णी नदीत उड्या टाकून जलआक्रोश आंदोलन केले. साहित्यिक पांडूरंग जाधव यांनी सुरु केलेल्या साखळी उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आंदोलनाचे आयोजन केले होते. सकाळी ६. ३० मिनीटानी मराठा बांधव नदीघाटावर जमा झाले. आरक्षणाच्या घोषणाबाजीनी परिसर दुमदुमला. आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकार सकारात्मक दिसत नसल्याने मराठा बांधवानी संतप्त भावना व्यक्त केल्या. आरक्षणाचा निर्णय लवकर घेतला नाही, तर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला.
पन्हाळा गडावर शासकिय अधिकाऱ्यांसह पर्यटकांना मज्जाव
मराठा आरक्षणासाठी आक्रमक झालेल्या पन्हाळा तालुका सकल मराठा समाजाने पन्हाळा गडावरील मुख्य नाक्यावर रास्तारोको आंदोलन केले. तसेच जोपर्यंत सरकार मराठा समाजाला आरक्षण देत नाही तोपर्यंत पन्हाळा गडावर शासकीय अधिकाऱ्यांसह पर्यटकांना बंदी घालण्यात येत आहे. त्यामुळे पन्हाळा गडावरील सर्व शासकीय कार्यालये झाली ठप्प झाली आहेत. पन्हाळा गडावर मराठा आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनात महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग दर्शिवला. रास्तारोको आंदोलनात पोलिसांचा मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
राधानगरीत तहसीलदार कार्यालयाच्या आवारात साखळी उपोषण
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून राधानगरी येथे काल संध्याकाळी कॅन्डल मार्च काढण्यात आला. तसेच आज सकाळ पासून तहसीलदार कार्यालयाच्या आवारात सकल मराठा समाजाच्यावतीने व शहरवासीयांच्यावतीने साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली. राधानगरी येथील छ, शाहू महाराज व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून या साखळी उपोषनास सुरवात करण्यात आली, यावेळी सरपंच सविता भाटळे यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत राधानगरी शहरात राजकीय पुढ्याऱ्यांना गावबंदीचा निर्णय घेण्यात आला, या संबंधीचे निवेदन तहसीलदार अनिता देशमुख यांना देण्यात आले, मनोज जरांगे-पाटील यांचे उपोषण सुरू आहे तो पर्यत साखळी उपोषण सुरू राहणार अशी भूमिका सकल मराठा समाजाने घेतली आहे.
सातवेत मराठा आरक्षणासाठी कॅन्डल मार्च
जरांगे- पाटील यांच्या लढ्यास पाठिंबा देण्यासाठी सातवेत ग्रामस्थांच्या वतीने कॅन्डल मार्च रॅली काढण्यात आली. सायंकाळी सात वाजता शिवाजी चौकातून रॅलीला सुरुवात झाली. गावातील मुख्य रस्त्यावरून कँडल मार्च रॅली काढण्यात आली. यावेळी जय भवानी….जय शिवाजी, आरक्षण आमच्या हक्काचं….नाही कुणाच्या बापाचं ! अशा घोषणा देण्यात आल्या. कॅन्डल मार्चमध्ये तरुण- तरुणी महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. शिवाजी चौकातील सांगता सभेत अविनाश निकम उत्तम पाटील यांनी मराठा आरक्षणाचे लढाई आता अंतिम टप्प्यावर आली आहे. आता माघार घेऊ नका व ग्रामस्थांनी सहकार्य करावे असे आव्हान केले.
पाचगाव येथे कॅन्डल मार्च काढून मनोज जरांगे- पाटलांना पाठींबा
पाचगाव येथे मंगळवारी संध्याकाळी कॅन्डल मार्च काढण्यात आला. यावेळी एक मराठा लाख मराठा च्या घोषणा देण्यात आल्या. सर्वपक्षीयांच्या वतीने पाचगाव येथील भैरवनाथ मंदिरापासून मंगळवारी संध्याकाळी कॅण्डल मार्च काढण्यात आला. यावेळी आरक्षण आमच्या हक्काचे, एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देण्यात आल्या. या कॅन्डल मार्च साठी पाचगाव च्या लोकनियुक्त सरपंच प्रियंका पाटील, उपसरपंच, माजी सरपंच संग्राम पाटील,माजी उपसरपंच संजय शिंदे, ग्रामपंचायत सदस्य अमोल गवळी, रोमा नलवडे,अतुल गवळी , अभिजीत पौडकर, नारायण गाडगीळ, चंद्रकांत सस्ते यांच्यासह सर्वपक्षीय नेते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मराठा समाजाला आरक्षण आंदोलकांकडून मलकापूर रस्ता रोको
मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे उपोषणास बसलेले , मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी शाहूवाडी तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने मलकापूर येथे रस्ता रोको करण्यात आला. यावेळी सर्वपक्षीयांनी एकत्र येत मराठा आरक्षणाची मागणी केली .तर सकल मराठा समाजाच्या वतीने शाहुवाडी तहसील कार्यालय येथे दोन नोव्हेंबर रोजी लाक्षणिक उपोषण करणार असल्याचा इशारा दिला. मराठा आरक्षणासंदर्भात शाहूवाडी तालुक्यात सर्वत्र उपोषण, आंदोलन सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावर मलकापूर येथे सकल मराठा समाजाच्या वतीने रस्ता रोको करण्यात आला .