6 फेब्रुवारी रोजी 13 मंत्री शपथबद्ध होणार : मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांची माहिती
प्रतिनिधी/ बेंगळूर
वेगवेगळय़ा कारणास्तव पुढे ढकलण्यात आलेल्या मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त मिळाला असून गुरुवार 6 रोजी सकाळी 10.30 वाजता मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांच्या मंत्रिमंडळात नूतन 13 मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. यामध्ये 10 नूतन आमदार तर 3 मूळ भाजप आमदारांचा समावेश केला जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री येडियुराप्या यांनी बेंगळूर येथे पत्रकार परिषदेत दिली.
मंत्रिमंडळ विस्ताराची माहिती राज्यपालांना दिली आहे. युती सरकारमधील 17 आमदारांनी राजीनामा दिल्यानेच आपण मुख्यमंत्री झालो आहोत. त्यांच्या राजीनाम्यामुळेच भाजप सरकार सत्तेवर आले आहे. तसेच पोटनिवडणुकीत पराभव झालेले एम. टी. बी. नागराज आणि एच. विश्वनाथ यांना मंत्रिमंडळात समावेश करून घेण्यास न्यायालयीन अडचणीत आहेत. त्यामुळे त्यांना मंत्रिमंडळात संधी दिली जाणार नसल्याचेही येडियुराप्पा यांनी सांगितले.
आर. शंकर यांना पक्षात योग्य पद दिले जाईल. आपल्या पक्षावर विश्वास ठेवून आलेल्यांचा विश्वासघात केला जाणार नाही. त्यांना दिलेले आश्वासन पूर्ण करण्यात येणार आहे. आर. शंकर यांची विधानपरिषदेवर निवड करून मंत्रिमंडळात संधी दिली जाणार आहे. यासाठी थोडय़ा वेळ जावा लागेल, असेही येडियुराप्पा म्हणाले. पोटनिवडणुकीत विजय मिळविलेल्या 11 जणांना मंत्रिपद देणार का?, असे विचारलेल्या प्रश्नावर मुख्यमंत्री येडियुराप्या यांनी मौन पाळल्याने चर्चेला उधाणही आले आहे.
कुमठहळ्ळी यांना निगम मंडळ अध्यक्षपद
महेश कुमठहळ्ळी यांना निगम मंडळाचे अध्यक्षपदाचे आश्वासन देण्यात आले आहे. तसेच ऑपरेशन कमळमध्ये महत्त्वाची भूमिका बजावलेल्या चन्नपट्टणचे माजी आमदार सी. पी. योगेश्वर यांना मंत्रिमंडळात सामावून घेण्याची सूचना हायकमांडने येडियुराप्पांना केली आहे. उर्वरित मूळ भाजपमधील लिंबावळी आणि कत्ती यांना मंत्रिमंडळात संधी देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी स्वतः घेतला आहे, असे समजते.
उमेश कत्तींचे मंत्रिपद निश्चित
काँग्रेस-निजद युती सरकारमधून राजीनामा देत पोटनिवडणुकीत विजय मिळविलेल्या 11 पैकी 10 जणांना मंत्रिपद दिले जाणार आहे, असे समजते. अथणीचे आमदार महेश कुमठहळ्ळी यांना वगळता उर्वरित सर्व आमदार मंत्री होणार आहेत. मूळ भाजपमधील आमदार उमेश कत्ती, अरविंद लिंबावळी, आणि सी. पी. योगेश्वर हे मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचे निश्चित आहे.