प्रतिनिधी / ओरोस:
पत्नीचा खून केल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या चिंदर सडेवाडी येथील अमित दत्तात्रय मुळे याचा जामीन अर्ज जिल्हा न्यायाधीश 1 व अतिरिक्त सत्र न्यायाधीश सुमित्रा घोडके यांनी फेटाळून लावला आहे. यापूर्वीही त्याचा एक अर्ज फेटाळण्यात आला होता. दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर त्याचा जामीन अर्ज पुन्हा फेटाळण्यात आला आहे. सरकार पक्षाच्यावतीने सहाय्यक सरकारी वकील संदीप राणे यांनी काम पाहिले.
अनुराधा अमित मुळे हिचा 26 सप्टेंबर रोजी मृत्यू झाला होता. याबाबत तिचा भाऊ लक्ष्मण मनोहर घाडीगावकर (रा. त्रिंबक) यांनी पोलिसात तिचा खून झाल्याची तक्रार दिली होती. बहीण अनुराधा हिचा अमित याच्याशी नऊ वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. त्यांना दोन वर्षांचा मुलगा आहे. मात्र पती अमित हा पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. त्यामुळे त्यांच्यात भांडणे होत होती व अमित तिला मारझोड करीत होता. आठ दिवसांपूर्वी बहिणीने आपल्याला याबाबत कल्पना दिली होती. त्यामुळे त्यांच्यात झालेल्या भांडणातून तिचा खून करण्यात आला असल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले होते. पोलिसांनी अमित याच्यावर भा. दं. वि. कलम 302 नुसार गुन्हा दाखल करून 26 सप्टेंबर रोजी अटक केली होती. 27 रोजी न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती. त्यानंतर त्याला न्यायालयीन कोठडी मंजूर करण्यात आली होती.
न्यायालयीन कोठडी मंजूर झाल्यानंतर त्याने जामिनासाठी अर्ज केला होता. तो अर्ज फेटाळून लावण्यात आला होता. दरम्यान 20 डिसेंबर रोजी पोलिसांनी दोषारोपपत्र दाखल केले आहे. त्यामुळे संशयित आरोपीने पुन्हा एकदा जामिनासाठी अर्ज केला होता. तोही फेटाळून लावण्यात आला आहे.