चंद्रकांत जोशी यांचे प्रतिपादन : कलामहर्षि के. बी. कुलकर्णी जन्मशताब्दीनिमित्त परिसंवाद कार्यक्रम
प्रतिनिधी/ बेळगाव
चित्र पाहण्यासाठी संवेदना जागृत असणे आवश्यक असून त्याचवेळी चित्रातील भावनेचा स्पर्श आपल्या मनाला होईल. चित्र समजून घेण्यासाठी जाणीव महत्त्वाची आहे. डोळ्याने पाहणे, बुद्धीने तपासणे आणि भावनेने जाणणे म्हणजे चित्र वाचणे. चित्र पाहण्याची सुंदरताच चित्र सहजपणे पाहण्याची आणि अनुभवण्याची शक्ती देते. चित्र आणि संगीताचे नाते जन्मापासूनचे असून त्यामधील भावनांचा स्पर्श मनाला होणे ही प्रक्रिया रसिक कलावंतावर अवलंबून आहे, असे मत कोल्हापूर येथील चंद्रकांत जोशी यांनी व्यक्त केले.
कलामहर्षि के. बी. कुलकर्णी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजित सोहळय़ाच्या परिसंवाद कार्यक्रमात त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. लोकमान्य रंगमंदिर येथे सोहळय़ाच्या दुसऱया दिवशी चित्र कसे वाचावे, या विषयावर परिसंवाद सत्राचे आयोजन केले होते. डॉ. गोविंद काळे (गोवा), चंद्रकांत जोशी (कोल्हापूर), मारुती पाटील (पुणे) या चित्रकारांच्या चर्चेतून आणि तत्त्वचिंतनातून चित्र कसे वाचावे याविषयीचे नवनवीन रसिक कलावंतांना अनुभवायला मिळाले. प्रारंभी ज्ये÷ चित्रकार दत्ता पाडेकर यांच्या हस्ते चित्रकारांचा सन्मान करण्यात आला. शिष्यरुपी रोपटय़ातून के. बी. कुलकर्णी या गुरुशिष्यांच्या कलेचा वटवृक्ष जगभर पोहोचला असून चित्र रेखाटणे ही पर्सनल गोष्ट असून ती समजून घेणे ही भावनेची संवेदनेची गोष्ट आहे असा सूर चर्चेतून व्यक्त करण्यात आला.
प्रारंभी मारुती पाटील यांनी स्वतः रेखाटलेल्या चित्रांचे सादरीकरण केले. चित्र पाहायची असतात ती आपोआप वाचली जातात. चित्र पाहणे, विषय समजून घेणे, माध्यम, मांडणी, लाईटशेडचा प्रभाव, विषयाला न्याय दिला आहे का, या टप्प्यातून चित्र समजून घेता येते. मात्र यासाठी मनाची सुंदरता असणे आवश्यक आहे. कला शिकण्यासाठी ड्रॉंईगचा अभ्यास प्रामुख्याने महत्त्वाचा आहे, असे त्यांनी सांगितले. के. बी. कुलकर्णी यांचा सहवास आणि त्यांच्यासमवेत पत्रांच्या माध्यमातून साधलेला संवाद याविषयी अनुभव सांगून पत्रांचे वाचन केले.
चित्र आणि संगीत यांचे नाते जन्माबरोबरच येते. वेदनेशिवाय संवेदना नाही, संवेदनेशिवाय निर्मिती नाही, यामुळे चित्रावर पेम करण्यासाठी वेदना म्हणजेच जाणीव महत्त्वाची आहे. कलेला किंमत नाही तर मूल्य आहे. ज्ञान, विज्ञान, अध्यात्म यांचा संगम असणारे चित्र मनाला स्पर्श करते त्याचवेळी चित्रकाराचे समाधान होते. चित्रकार चित्र रेखाटून बाजूला जातो. यामुळे क्रियाशील कलेप्रमाणे या कलेला न्याय मिळत नाही, अशी खंत यावेळी चंद्रकांत जोशी यांनी व्यक्त केली. डॉ. गोविंद काळे यांनी कलामहर्षि के. बी. कुलकर्णी यांच्याविषयीच्या आठवणी सांगत हा चिंतनपर सोहळा चित्राच्या दुनियेत नवीन दृष्टी देणारा ठरणार असल्याचे मत व्यक्त केले.
यानंतर विद्यार्थ्यांनी चित्रकला समजून घेताना येणाऱया अडचणी याविषयी प्रश्न विचारले तसेच पाश्चिमात्यांप्रमाणे भारतामध्ये चित्राला तितकीशी किंमत का दिली जात नाही या प्रश्नावर चर्चा करण्यात आली. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल चौधरी यांनी केले. जगदेश कुंटे यांनी आभार मानले.
चित्राचे प्रात्यक्षिक अनुभवण्याची संधी
कलामहर्षिंच्या जन्मशताब्दी सोहळय़ाचे औचित्य साधून चित्रकार वासुदेव कामत यानी चित्राचे प्रात्यक्षिक सादर केले. चित्र पाहण्यापासून चित्र रेखाटावे कसे असे सर्वसमावेशक कार्यक्रम सोहळय़ाच्या निमित्ताने आयोजित केले आहे. सोहळय़ाच्या दुसऱया सत्रात ज्ये÷ चित्रकारांकडून चित्र रेखाटण्याची कला रसिक कलावंतांनी अनुभवली. यावेळी वासुदेव कामत यांनी रसिकांशी संवाद साधत चित्रातील बारकावे आणि चित्र अनुभवण्याची कला कशी अवगत होते याची माहिती दिली. चित्राचे प्रात्यक्षिक सादर केले. स्मिता परांजपे यांचे हुबेहुब व्यक्तिचित्र रेखाटून उपस्थितांची दाद मिळविली. चिंतनशील व्याख्यानाबरोबराच दुपारी चित्र रेखाटण्याची कला पाहण्याच्या उद्देशाने उपस्थित श्रोत्यांनी सभागृह फुल्ल होते. यानंतर मर्यादा पुरुषोत्तम हा स्लाईड शो सादर करण्यात आला. वासुदेव कामत यांनी सदर स्लाईड शोचे सादरीकरण केले. यानिमित्ताने चित्राचा प्रवास अनुभवण्याची संधी लाभली. यानंतर वासुदेव कामत व स्मिता परांजपे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी रवी परांजपे, विकास पाटणेकर उपस्थित होते.
उत्कृष्ट चित्रांचा गौरव
दुपारच्या सत्रात चित्रकला स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ पार पडला. कलामहर्षि के. बी. कुलकर्णी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. यामध्ये महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक राज्यातून 300 हून अधिक कलाकृती स्पर्धेसाठी आल्या होत्या. यातून 40 चित्रांची निवड करून प्रदर्शनात सदर चित्रे लावण्यात आली. त्यापैकी प्रथम उत्कृष्ट सहा चित्रांची निवड करून त्यांना पारीतोषिक वितरित करण्यात आले. दत्ता पाडेकर व वासुदेव कामत यांच्या हस्ते सदर विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. प्रथम क्रमांक आतिफ पाच्छापुरी (जे. एन. भंडारी स्कूल, शिनोळी), द्वितीय धनराज करमळी (द. आर्ट इंटिग्रेशन फाईन आर्ट, गुलबर्गा), मनोज पाटील, (जे. एन. भंडारी, शिनोळी), प्राप्ती लोखंडे (दळवीज आर्ट, कोल्हापूर), सलमा परवीन (एमसीई सोसायटी, आझम कॅम्पस, पुणे), वैष्णवी खांडेकर (जे. एन. भंडारी, शिनोळी) यांनी अनुक्रमे मिळविले.