बदलती जीवनशैलीने आपल्यासमोर अनेक समस्या निर्माण केल्या आहेत. स्थूलपणा ही त्यातील महत्त्वाची आणि मोठय़ा प्रमाणात आढळणारी समस्या आहे. स्थूलतेपासून सुटका करण्यासाठीचे हरेक प्रयत्न आपण करतो, त्यात आहारातील बदल खूप महत्त्वाचा आहे. आपल्या सर्वांच्या आहारात विविध कडधान्यांचा समावेश असतोच. त्यापैकी हिरवे मूगही आहारात भाजी, आमटी अशा विविध रूपात वापरले जातात.
- मूग हे कडधान्य चवदार तर असतेच; पण ते पचायला सोपे आणि स्थूलता कमी करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहेत. वजन कमी करण्यासाठी आहारात हिरवे मूग सामील करावे. मूग उकडून, सलाडमध्ये घालून सेवन करता येतात.
- हिरवे मूग चयापचय क्षमता वाढवतात, त्यामुळे वजन कमी होते.
- मुगामध्ये भरपूर प्रमाणात प्रथिने आणि तंतुमय पदार्थ असतात. त्यामुळे पोट भरल्याची जाणीव होते.
- मूगामध्ये पोषक घटकांचे प्रमाण खूप जास्त असते.
- वजन कमी करण्याबरोबरच रक्तशर्करा नियंत्रित करण्यासही ती फायदेशीर आहे.
- मुगामध्ये पोटॅशिअम आणि लोह भरपूर प्रमाणात असते.
- रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी मुगाचे सेवन खूप फायदेशीर ठरते. त्यामुळे हृदयाचे स्नायू मजबूत आणि निरोगी राहातात.