इस्लामाबाद
इराणला लागून असलेल्या पाकिस्तानच्या सिंध प्रांतात कोरोनाच्या रुग्णांची संख्या अचानक वाढल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पाकिस्तानातील एकूण रुग्णांची संख्या वाढून मंगळवारी 193 झाली आहे. लाहोर येथे एका संशयित रुग्णाचा मृत्यू झाल्याने संकट अधिकच गडद होत चालले आहे.
सिंध प्रांतात 155, खैबर पख्तूनख्वामध्ये 15, बलुचिस्तानमध्ये 10, गिलगिट-बाल्टिस्तानमध्ये 5, इस्लामाबादमध्ये दोन तर पंजाबमध्ये एक रुग्ण सापडला आहे. सिंध सरकारचे प्रवक्ते मुर्तझा वहाब यांनी मंगळवारी ट्विट करत 119 रुग्ण आढळल्याचा दावा केला आहे. तर 115 जणांना कोरोनाची लागण झाल्याची पुष्टी मिळाली नसल्याचे म्हटले आहे.
ताफ्तान येथे विलगीकरण करण्यात आलेल्या भाविकांची संख्या 9 हजारांपेक्षा अधिक आहे. हे सर्व भाविक इराणमधून परतले असून बलुचिस्तान सरकारने त्यांना विलगीकरण शिबिरात ठेवले आहे. विलगीकरणाचा 14 दिवसांचा कालावधी समाप्त झाल्यावर भाविकांना स्वतःच्या शहरात परतण्याची अनुमती देण्यात आली आहे. सिंध आणि खैबर पख्तूनख्वा प्रांताने या भाविकांचा पुढील प्रवास सुरू होण्यापूर्वी पुन्हा वैद्यकीय चाचणी करण्याचा निर्णय घेतला आहे.