ऑनलाईन टीम / नवी मुंबई :
सर्वोच्च न्यायालयाने बीएस-4 वाहनांच्या विक्रीसाठी 24 एप्रिलपर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे ऑटो क्षेत्राला काहीसा दिलासा मिळाला आहे.
सरकारने 31 मार्चपर्यंत बीएस 4 वाहनांच्या विक्रीला परवानगी दिली होती. मात्र, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण देश लॉकडाउन असल्याने पडून असलेल्या ंs4 वाहनांच्या विक्रीला ब्रेक मिळाला आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने वाहन उद्योगाला दिलासा देत 24 एप्रिल म्हणजे लॉकडाउन संपल्यानंतरचे अतिरिक्त 10 दिवस मुदतवाढ दिली आहे.
24 एप्रिलपर्यंत बीएस-4 वाहनांची विक्री आणि नोंदणी सुरू असेल. ही मुदतवाढ दिल्ली-एनसीआरमधील वाढत्या प्रदूषणामुळे तेथील वाहन वितरकांसाठी नसेल, असेही कोर्टाने स्पष्ट केले. सर्वोच्च न्यायालयात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही सुनावणी झाली. देशभरात अद्यापही विविध डिलर्सकडे 6,400 कोटी रुपयांचा बीएसआयव्ही वाहनांचा स्टॉक शिल्लक आहे.