ब्रिटनच्या महाराणीचे संबोधन : लीबियाच्या माजी पंतप्रधानांचा कोरोनामुळे मृत्यू : जॉन्सन रुग्णालयात
204 देश आणि जगातील सर्वच खंडांमध्ये शिरकाव केलेल्या कोरोना विषाणूमुळे मृत्युमुखी पडलेल्या लोकांची संख्या सोमवारी 70320 वर पोहोचली आहे. जगभरात कोरोनाचे 1284754 रुग्ण सापडले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे 271731 जणांना कोरोनापासून मुक्तता मिळाली आहे. अमेरिका लवकरच कोरोनावर नियंत्रण मिळवेल, अशी आशा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली आहे. तर कोरोनाची लागण झालेले ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना रविवारी रात्री उशिरा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांनी संकटानंतर पुन्हा चांगला काळ अवतरणार असल्याचा विश्वास ब्रिटनला दिला आहे.
काळोखाच्या अखेरीस आशेचा किरण
या काळोख्या भुयाराच्या अखेरीस आशेचा किरण दिसून येत आहे. घडणाऱया गोष्टी पाहता प्रकाश अधिक दूर नसल्याचे वाटत असल्याचे उद्गार अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काढले आहेत. परंतु त्यांनी पुन्हा एकदा मास्क परिधान करण्यास नकार दिला आहे. ट्रम्प यांचे कुटुंब मात्र फेस मास्क परिधान करण्याचे आवाहन करत आहे.
अमेरिकेत वाघिणीला लागण
न्यूयॉर्क ब्रोंक्स प्राणिसंग्रहालयात 4 वर्षीय वाघिणीला लागण झाली आहे. माणसांमध्ये आढळून येणारी लक्षणेच तिच्यात दिसून आली आहेत. या वाघिणीचे नाव नादिया असून तिची बहिण एजुल तसेच तीन आफ्रिकन सिंहांमध्ये कफाची लक्षणे आढळली आहेत. परंतु त्यांच्यातील संसर्गाची पुष्टी मिळू शकलेली नाही. भुकेची खालावल्याने त्यांचे नमुने चाचणीसाठी घेण्यात आले होते.
ब्रिटनच्या महाराणीचे आवाहन
एकजूट होऊन आम्ही महामारीवर नियंत्रण मिळवू. एकतेतच शक्ती असल्याचा पुनरुच्चार करत आहे. आम्ही कशाप्रकारे या महामारीचा सामना केला हे आठवून भविष्यात लोकांना गर्व वाटणार आहे. विश्वास ठेवा, चांगला काळ नक्की परतणार असल्याचे म्हणत ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ यांनी देशाला संबोधित केले आहे.
लीबियामध्ये संकट वाढणार
लीबियाचे माजी पंतप्रधान महमूद जिब्रिल यांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. 2011 मध्ये हुकुमशहा मुअम्मर गद्दाफी यांना सत्तेवरून हटविण्यात आल्यावर जिब्रिल पंतप्रधान झाले होते. त्यांच्या पक्षाने जिब्रिल यांच्या मृत्यूची पुष्टी दिली आहे. 68 वर्षीय या नेत्याला लागण झाल्याचे दोन आठवडय़ांपूर्वी समजले होते.
चीनमध्ये दिवसात 1 बळी
चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने रविवारी रात्री निवेदन प्रसिद्ध केले आहे. यानुसार शनिवार आणि रविवारदरम्यान चीनमध्ये 24 तासांमध्ये 39 नवे रुग्ण समोर आले आहेत. तर एका कोरोनाग्रस्ताचा मृत्यू झाला आहे. देशातील एकूण रुग्णांची संख्या आता 81 हजार 708 झाली आहे. हुबेई प्रांतात कुठलाच नवा रुग्ण आढळून आलेला नाही.
अभिनेत्री ली फिएरोचा मृत्यू
स्टीव्हन स्पीलबर्ग यांच्या ‘जॉज’ या सर्वोत्तम चित्रपटात मिसेस किंटनर ही भूमिका साकारलेल्या अभिनेत्री ली फिएरो यांनी जगाचा निरोप घेतला आहे. फिएरो 91 वर्षांच्या होत्या आणि कोरोना संसर्गामुळे निर्माण झालेल्या गुंतागुंतीमुळे त्यांचा मृत्यू झाला आहे. फिएरो यांना हॉलिवूडमधील उत्तम अभिनेत्रींपैकी एक मानले जायचे.
पंतप्रधान वराडकर करणार उपचार
कोरोना संकटाला तोंड देणाऱया आयर्लंडचे पंतप्रधान लियो वराडकर यांनी पुन्हा एका डॉक्टरी पेशा स्वीकारला आहे. राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी डॉक्टर राहिलेल्या वराडकर यांनी पुन्हा एकदा स्वतःची डॉक्टर म्हणून नोंदणी करून घेतली आहे. कोरोनाने ग्रस्त असलेल्या लोकांना फोनवरून सल्ला देण्याचे काम पंतप्रधानांना दिले जाऊ शकते.
आयर्लंडमध्ये कोरोनाबाधितांना सर्वप्रथम फोनवरून सल्ला दिला जातो. या उपाययोजनेद्वारे महामारीचा संसर्ग कमीत कमी व्हावा असा प्रयत्न केला जातो.
पाक-अफगाण सीमा खुली होणार
कोरानाचा फैलाव रोखण्यासाठी पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवर घातलेले निर्बंध हटविण्यात येणार आहेत. दोन्ही देशांना लागून असलेली सीमा 4 दिवसांसाठी खुली केली जाणार आहे. टाळेबंदीमुळे पाकिस्तानात अडकून पडलेल्या अफगाण नागरिकांना परत पाठविण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
अमेरिका, ब्रिटनमध्ये पुन्हा टेलिमेडिसीन
अमेरिकेनंतर आता ब्रिटनमध्येही टेलिमेडिसीनचा काळ पुन्हा अवतरला आहे. कोरोनाचे रुग्ण आता डॉक्टरांच्या क्लीनिकबाहेर रांगेत बसत नाहीत. ते थेट डॉक्टरला फोन करून औषधांपासून उपायांची माहिती घेत आहेत. व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे रुग्ण स्वतःची लक्षणे डॉक्टरांना समजवू शकत आहेत. टेलिमेडिसीनद्वारे सोशल डिस्टंसिंग शक्य आहे.
जपानमध्ये 400 नवे रुग्ण
जपानच्या आरोग्य मंत्रालयानुसार देशात रविवारी 400 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर तीन रुग्णांना जीव गमवावा लागला आहे. जपानमध्ये आतापर्यंत एकूण 4366 रुग्णांची नोंद झाली आहे. पंतप्रधान शिंजो अबे मंगळवारी एक महिन्याच्या आणीबाणीची घोषणा करू शकतात. युरोपीय देशांच्या तुलनेत ही आणीबाणी वेगळय़ा स्वरुपाची राहणार असल्याचे अबे यांनी सांगितले आहे.
ऑस्ट्रेलियासमोर नवे संकट
कोरोनाचा संसर्ग ऑस्ट्रेलियात वाढत असताना तेथे आलिशान क्रूज रुबी प्रिन्सेसने दहशत निर्माण केली आहे. या क्रूजवर कोविड-19 चे 240 रुग्ण आढळले आहेत. ऑस्ट्रेलियाच्या सरकारने हे जहाज सिडनीत रोखले असून तेथेच रुग्णांना शक्य ती मदत केली जात आहे. रुबी प्रिन्सेसने 19 मार्च सिडनी बंदरावर नांगर टाकला होता. या क्रूजवरील 2 हजारपेक्षा अधिक प्रवाशांना हिंडण्याची अनुमती मिळाली होती. पण काही प्रवाशांमध्ये फ्लूची लक्षणे आढळल्याने चाचणी करण्यात आली असता जहाजावरील 340 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी पोलिसांनी जहाजाच्या संचालकांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्याची घोषणा केली आहे.