जनतेने लाभ घेण्याचे नगराध्यक्ष मुख्याधिकाऱयांचे आवाहन
वार्ताहर / कणकवली:
कणकवली शहरात न. पं.तर्फे सहा ठिकाणी हॅण्डवॉश केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. या केंद्रांचा शुभारंभ नगराध्यक्ष समीर नलावडे व मुख्याधिकारी अतुल पिंपळे यांच्या उपस्थितीत करण्यात आला. शहरात पटकीदेवी मंदिराजवळ, श्रीधर नाईक चौक, रेल्वे स्टेशनजवळ, पं. स.कडे छ. शिवाजी महाराज पुतळ्य़ाजवळ, तेलीआळी या सहा ठिकाणी ही केंद्रे सुरू करण्यात आल्याची माहिती नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली. या केंद्राचा नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन न. पं.मार्फत करण्यात आले आहे.
या हॅण्डवॉश केंद्राच्या ठिकाणी दोन टाक्या ठेवण्यात आल्या असून एकात डेटॉल सोल्युशन व एका टाकीत पाणी ठेवण्यात आले आहे. पायातील पॅडलद्वारे हे सोल्युशन हातावर घेतल्यावर दुसऱया पॅडलद्वारे पाणी हातावर घेऊन किमान 20 सेकंद हात धुवायचे आहेत, अशी माहिती मुख्याधिकारी पिंपळे यांनी दिली. नगरसेवक ऍड. विराज भोसले, डॉ. गुरुदास कडुलकर, कर्मचारी किशोर धुमाळे, रवींद्र म्हाडेश्वर, सतीश कांबळे, प्रशांत राणे आदी उपस्थित होते.