ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या खासगी नोकराला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे ट्रम्प यांनीही कोरोना चाचणी करण्यात आली असून, ती निगेटिव्ह आली. मात्र, खबरदारी म्हणून आपण दररोज कोरोना चाचणी करणार असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे. व्हाईट हाऊसने याबाबतची माहिती दिली आहे.
कोरोना संसर्ग झालेली व्यक्ती अमेरिकेच्या नौदलातील असून ती ट्रम्प यांच्या वैयक्तिक सेवेत होती. ही व्यक्ती सैन्याच्या एका एलिट युनिटचा भाग आहे. बुधवारी ही व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळली. त्यामुळे व्हाईट हाऊसमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे ट्रम्प यांची कोरोना चाचणी करण्यात आली. ट्रम्प कोरोना निगेटिव्ह असले तरीही ते खबरदारी म्हणून दररोज कोरोना चाचणी करणार आहेत.
या व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग नेमका कुठून झाला, याचा शोध आरोग्य प्रशासन घेत आहे. तसेच या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यात येत आहे.