प्रतिनिधी / म्हापसा
नागवा येथे प्रदीप शिरोडकर यांच्या मालकीच्या गॅरेजला व तेथे फर्निचर व्यवसाय करणाऱया अजय व नवाब पाल यांच्या दुकानाला आग लागून या सर्वांचे मिळून सुमारे 5 लाखाचे नुकसान झाले. ही आग पहाटे 2.40 वाजण्याच्या दरम्यान लागली असल्याची माहिती पीळर्ण अग्निशमन दलाचे उपअधिकारी प्रदीप मांद्रेकर यांनी दिली. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. गॅरेजमधील एकूण 7 दुचाक्या पूर्णपणे जळून खाक झाल्या. त्यात 2 नव्या तर 5 जुन्या वाहनांचा समावेश होता अशी माहिती मालक प्रदीप शिरोडकर यांनी दै. तरुण भारतला दिली.
आगीचे कारण गुलदस्त्यात
नागवा हडफडे येथे चर्चजवळ शेतात शिरोडकर यांच्या मालकीची गॅरेज होती. त्या गॅरेजमध्ये मध्यरात्री 2.40 वाजण्याच्या दरम्यान आग लागली. आग नेमकी कशी लागली हे कुणालाच माहीत नाही. गॅरेजमधून आगीचे लोळ बाहेर पडत असल्याची माहिती पीळर्ण अग्निशमन दलास दिल्यावर उपअधिकारी प्रदीप मांद्रेकर यांच्या नेतृत्वाखाली दिनेश गावडे, भावशे शिरोडकर, विराज कांदोळकर, दत्तप्रसाद सिनारी यांनी घटनास्थळी धाव घेतली व आज विझविण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत अर्धे सामान दुचाक्या आगीने पेटत होत्या. आगीचा रुद्रावतार पाहून म्हापशाहून अन्य एक बंब मागविण्यात आले. उपअधिकारी ज्ञानेश्वर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली विष्णू केसरकर, दत्तराज च्यारी, हितेश परब, स्वप्नेश कळंगुटकर यांनी घटनास्थळी धाव घेतली व आग विझविली.
आगीत दुचाक्या, फर्निचर खाक
या आगीत 7 दुचाक्या, गॅरेजमधील सर्व सामान, छप्पर बाजूला असलेले फर्निचर दुकान, नारळ, कुशन, भंगारात ठेवलेले लाकडी सामान पूर्णपणे जळून खाक झाले. सुमारे दीडतास आगीशी झुंझ देत अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझविण्यास यश मिळविले.