महाराष्ट्रातून येणाऱयांचा समावेश अधिक : एकूण रुग्णसंख्या 1959 वर
प्रतिनिधी/ बेंगळूर
लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर परप्रांतात गेलेले कामगार कर्नाटकात परतत असून त्यांच्यामुळे राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा दुप्पट वेगाने वाढत आहे. मागील 24 तासांत सुमारे 216 नव्या रुग्णांची भर पडली आहे. एका दिवसात 200 पेक्षा अधिक रुग्ण आढळून येण्याचा हा विक्रमच आहे. यामुळे राज्यातील रुग्णसंख्या 2 हजारासमिप (1959) येऊन ठेपली आहे.
कर्नाटकात कोरोनाचा फैलाव वेगाने होत आहे. श्रमिक रेल्वेने परराज्यातून आलेल्या महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान आणि तामिळनाडूहून आलेल्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग अधिक आढळून येत आहे. त्यामुळे राज्यात आठवडाभरात 1 हजारपेक्षा अधिक नव्या रुग्णांची भर पडली आहे. शनिवारी 216 नवे रुग्ण आढळले. तर एकाचा कोरोनामुळे बळी गेला तर एकाने आत्महत्या केली आहे. आरोग्य खात्याने प्रसिद्ध केलेल्या दुपारच्या बुलेटिनमध्ये 196 कोरोना रुग्णांची नोंद होती. सायंकाळपर्यंत त्यात आणखी 20 जणांची भर पडली. दिवसभरात आढळून आलेल्या कोरानाग्रस्तांमध्ये महाराष्ट्रातून परतलेल्या 189 जणांचा समावेश आहे.
मंडय़ा, हासन, उडुपी पाठोपाठ आता यादगिर जिल्हय़ात कोरोनाचा उदेक झाला आहे. या जिल्हय़ात सर्वाधिक शनिवारी 72 नवे कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत. रायचूरमध्ये 40, मंडय़ा, 28, चिक्कबळ्ळापूर 26, गदगमध्ये 15, धारवाड जिल्हय़ात 5, बेंगळूर शहर व हासन जिल्हय़ात प्रत्येकी 4, बिदर, मंगळूर, दावणगेरे, बळ्ळारी आणि कोलार जिल्हय़ात प्रत्येकी 3, कारवार जिल्हय़ात 2 तसेच बेळगाव, गुलबर्गा जिल्हय़ात प्रत्येकी 1 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
आणखी एका पोलिसाला संसर्ग
पोलीस जीप चालविणाऱया चालकाला देखील कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यामुळे बेंगळूरच्या महालक्ष्मी लेआऊट परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सदर पोलीस वास्तव्यास असलेला शंकरनगर परिसर सीलडाऊन करण्यात आला आहे. जीपचालक असणाऱया पोलिसाला कोरोनाची बाधा झाल्याचा संशय निर्माण झाल्याने त्याला ईएसआय इस्पितळात दाखल करण्यात आले होते. त्याच्या स्वॅबचा अहवाल शनिवारी पॉझिटिव्ह आला आहे.
32 वर्षीय युवकाचा बळी
बेंगळूरमधील 32 वर्षीय युवकाचा बळी गेला आहे. त्यामुळे मृतांची संख्या 42 झाली आहे. मृत युवक 19 मे रोजी श्वसनाच्या त्रासामुळे इस्पितळात दाखल झाला होता. नंतर त्याला कोरोना असल्याचे निदान झाले होते. शनिवारी त्याचा हृदयविकाराने मृत्यू झाला. तो क्षयरोगबाधित होता. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांमध्ये तो अत्यंत कमी वयाचा आहे, अशी माहिती आरोग्य खात्याने दिली आहे. तर मंगळूर जिल्हय़ातील एकाने आत्महत्या केली आहे.