जिल्हाधिकारी डॉ. एस. बी. बोम्मणहळ्ळी यांची सूचना
प्रतिनिधी/ बेळगाव
मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टी आणि महापुरामुळे जिल्हय़ात मोठे नुकसान झाले आहे. यामुळे यंदा पावसाळा सुरु होण्यापूर्वीच संभाव्य अतिवृष्टीबाबत पूर्व खबरदारी घेण्यात यावी, अशी सूचना जिल्हाधिकारी डॉ. एस. बी. बोम्मणहळ्ळी यांनी अधिकारी वर्गास केली आहे. मंगळवारी जिल्हा पंचायत सभागृहात जिल्हा नैसर्गिक आपदा निवारण प्राधिकारची बैठक पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी होते. मागील वर्षी अतिवृष्टी आणि महापुराच्या संदर्भात निर्माण झालेल्या समस्यांबाबत माहिती घेऊन त्या दिशेने उपाययोजना कराव्यात अशी सुचनाही जिल्हाधिकाऱयांनी यावेळी केली.
महापूरात अडकणाऱया नागरिकांच्या रक्षणासाठी लहान बोटींची व्यवस्था करावी. त्यांच्यासाठी पुनर्वसन परिहार केंद्रांची स्थापना करण्याबाबत उपाययोजना हाती घ्याव्यात, विभागिय स्थरावरही याबाबत येत्या आठवडय़ात सर्व खात्यांची बैठक घेऊन चर्चा करण्यात यावी, अशी सूचना जिल्हाधिकारी डॉ. एस. बी. बोम्मणहळ्ळी यांनी प्रांताधिकारी शिवानंद बजंत्री यांना केली. जिल्हय़ात लवकरच एनडीआरएफ पथकातर्फे भेट देऊन पाहणी करण्यात येणार आहे. जिल्हय़ात आवश्यक असणाऱया ठिकाणी बोटींबाबत प्रस्ताव देण्यात यावा. तसेच बोटींची व्यवस्था तात्काळ होण्यासाठी आतापासूनच पूर्व तयारी करावी, अशी सूचना जिल्हाधिकाऱयांनी केली. जिल्हय़ात सध्या उपलब्ध असणाऱया बोटींबाबत माहिती संग्रहित करून बोटींची दुरुस्ती आणि आवश्यक पूर्व खबरदारी घ्यावी, विशेषता जिल्हय़ातील नदी काठावर असणाऱया गावातील नागरिकांना संभाव्य पूर परिस्थितीत संरक्षणासाठी आवश्यक बोटींची व्यवस्था करावी, असेही जिल्हाधिकाऱयांनी सांगितले.
बेळगाव शहरातील अनेक इमारतींच्या तळ घरात वीज मिटर बसविण्यात आले आहेत. मात्र अतिवृष्टीमुळे पाणी घुसून मिटर खराब होण्याची शक्यता आहे. मागील वर्षी वीज संपर्कातही व्यत्यय निर्माण झाला होता. यामुळे संबंधित इमारत मालकांनी तळ घरातील वीज मिटर तात्काळ हटवावीत. तळ घरात वीज मिटर बसविलेल्या इमारत मालकांना तात्काळ नोटीस पाठविण्यात यावी, अशी सूचना जिल्हाधिकाऱयांनी हेस्कॉम अधिकाऱयांना यावेळी केली. तसेच वीज मिटर न हटविणाऱया इमारतींचा वीज पुरवठा तोडण्यात यावा, अशी सूचनाही त्यांनी केली. वीज खांब, ट्रान्सफॉर्मर आदींच्या देखभालीकडे हेस्कॉम अधिकाऱयांनी आतापासूनच आवश्यक सामुग्री आणि कर्मचाऱयांसह सज्ज रहावे, असेही जिल्हाधिकाऱयांनी यावेळी सांगितले.
प्रांताधिकारी शिवानंद बजंत्री, पोलीस आयुक्त बी. एस. लोकेशकुमार, अप्पर जिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी, महापालिका आयुक्त जगदीश के. एच. आदी व्यासपीठावर उपस्थित होते. बैठकीस उपविभाग अधिकारी अशोक तेली, कृषी खात्याचे सहसंचालक जिलानी मोकाशी, जिल्हा आरोग्य आणि कुटुंब कल्याण अधिकारी डॉ. एस. व्हे. मुन्याळ यांच्यासह विविध खात्याचे अधिकारी उपस्थित होते.