कराची / वृत्तसंस्था
पाकिस्तानचा माजी कर्णधार व जागतिक स्तरावरील अव्वल डावखुरा गोलंदाज वासिम अक्रमने त्याने खेळलेल्या सर्व खेळाडूंमध्ये 5 अव्वल फलंदाज नमूद करत त्यात विंडीजचा महान फलंदाज व्हिव रिचर्ड्सला अव्वल स्थान तर सचिन तेंडुलकरला पाचवे स्थान दिले आहे. अक्रमचा माजी संघसहकारी बसित अलीने त्याला युटय़ूब शोमध्ये 5 फलंदाजांची नावे दिली आणि त्यांचा क्रम निश्चित करण्यास सांगितले होते. अक्रमने यात रिचर्ड्स, न्यूझीलंडचा माजी कर्णधार, दिवंगत मार्टिन क्रो, विंडीजचा ब्रायन लारा, पाकिस्तानचा इंझमाम-उल-हक व सचिन तेंडुलकर अशी क्रमवारी निश्चित केली.
‘बिनतोड तंत्र आणि करिष्मा या निकषावर सर रिचर्ड्स यांची बरोबरी करणे कोणालाच शक्य नव्हते. सचिनला मी व वकार असे आम्ही दोघांनीही फारशी गोलंदाजी केलेली नाही. सचिन 1989 मध्ये पाकिस्तान दौऱयावर आला आणि त्यानंतर आम्ही त्याच्याविरुद्ध थेट 1999 मध्येच खेळलो. मी शारजामध्ये वनडेत सचिनविरुद्ध गोलंदाजी केली. पण, कसोटी क्रिकेट वेगळे असते. त्यात मी माझ्या कारकिर्दीत सर्वोच्च फॉर्ममध्ये असताना सचिनला सामोरे जाण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळे, त्याचे परीक्षण करणे कठीण आहे. त्यामुळे, मी त्याला पाचवे स्थान दिले आहे’, असे अक्रम यात म्हणाला.
उत्तम तंत्रामुळे मार्टिन क्रो दुसऱया स्थानी आहे. रिव्हर्स स्विंग कसे खेळायचे, याचे अवघ्या क्रिकेट जगताला अल्प ज्ञान असताना तो आमच्याविरुद्ध उत्तम खेळला. वकारने 3 सामन्यात 30 बळी घेतले आणि दुखापतग्रस्त होण्यापूर्वी दोन-एक लढतीत मी 16 बळी घेतले. क्रोने त्या मालिकेत 2 शतके झळकावली होती, या आठवणीला अक्रमने उजाळा दिला.
ब्रायन लारा दर्जेदार फलंदाज होता आणि त्याला गोलंदाजी करणे नेहमी आव्हानात्मक असायचे. त्याची बॅट कोणत्याही दिशेने आदळायची आणि चेंडू सीमापार निघून जायचा. त्यानंतर चौथ्या स्थानी इंझमाम आहे. तसे पाहता इंझमामला गोलंदाजी करण्याचा प्रश्नच नव्हता. त्याचबरोबर सचिनला देखील मी खूपच कमी गोलंदाजी केली. त्यामुळे या दोघात सरस कोण, हे ठरवणे कठीण आहे, असे अक्रमने शेवटी नमूद केले.