आरोग्य विभागाचा गलथान कारभार सुरुच : घरी पाठविल्यानंतर केली स्वॅब तपासणी
वार्ताहर/ सांबरा
मुतगे येथील दोघींचा कोरोनाचा अहवाल पॉझिटीव्ह आला म्हणून बेळगाव येथील सिव्हिल हॉस्पिटलला हलविण्यात आले व लगेच चार दिवसांनी अहवाल निगेटिव्ह आल्याचे सांगून त्यांना घरी सोडून देण्यात आले. या दरम्यान दोघींच्याही कुटुंबीयांना येथील सरकारी मराठी प्राथमिक शाळेत क्वारंटाईन करण्यात आले. व स्वॅब तपासणी न करताच दि. 9 रोजी सर्वांना घरी पाठवून देण्यात आले. घरी आल्यानंतर दोन दिवसांनी स्वॅब तपासणीसाठी त्यांच्या घरी भेट देऊन संबंधित कर्मचाऱयांनी नमुने घेतले. या प्रकारामुळे आरोग्य खात्याचा गलथान कारभार पुन्हा एकदा चव्हाटय़ावर आला आहे. व आरोग्य खात्याचे नेमके काय चालले आहे, अशी ग्रामस्थांत कुजबूज सुरू आहे.
वास्तविक पाहता एखादा रुग्ण आढळल्यानंतर रुग्णाच्या कुटुंबीयांना क्वारंटाईन करून लगेच स्वॅब तपासणी केली जाते. येथील रुग्णांच्या बाबतीत मात्र उलटा प्रकार घडला आहे. आधी कोरोनाचा अहवाल पॉझिटीव्ह आलेल्या दोघीजणींना चार दिवसातच अहवाल निगेटिव्ह आल्याचे सांगून घरी सोडण्यात आले. तर त्यांच्या कुटुंबीयांची आठ दिवसांनी स्वॅब तपासणी करण्यात आली आहे. क्वारंटाईनमध्ये असताना स्वॅब तपासणी गरजेचे आहे. मात्र याकडे आरोग्य विभागाचे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. घरी पाठविल्यानंतर संबंधितांचे अहवाल पॉझिटीव्ह आले तर याचा गंभीर परिणाम घेऊ शकतो. आरोग्य खात्याच्या गलथान कारभारामुळे ग्रामस्थांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. यापुढे तरी आरोग्य विभागाने जागरूक राहून कार्य करावे, अशी चर्चा ग्रामस्थांतून सुरू आहे..