ऑनलाईन टीम / काठमांडू :
चीनच्या तिबेटमधील मुख्य रस्ते विकास प्रकल्पाने नद्यांचा मार्ग बदलून नेपाळची 33 हेक्टर जमीन ताब्यात घेत आपली सीमा वाढविली आहे. नेपाळ सरकारच्या कृषी मंत्रालयाने त्यांच्या एका अहवालात हे वास्तव मान्य केले आहे.
नेपाळच्या उत्तरेस चीनची सीमा आहे. दोन्ही देशांमध्ये सहा चेकपोस्ट आहेत. त्याद्वारे दोन्ही देशात व्यापार होतो. कृषी मंत्रालयाच्या सर्वेक्षण विभागाने म्हटले आहे की, 11 नद्यांचा मार्ग बदलण्यापूर्वी नेपाळने 33 हेक्टर जमीन गमावली आहे. ही जमीन हुमला, रसुआ, सिंधुपालचौक आणि संखुवासभा जिल्ह्यातील आहे.
नेपाळमधील कृषी खात्याच्या अंतर्गत येणाऱ्या जमीन मोजणीसंदर्भातील सर्वेक्षण खात्याने 11 ठिकाणांची यादीच आपल्या अहवालामध्ये दिली आहे. या 11 पैकी 10 ठिकाणी चीनने 33 हेक्टर जमीन बळकावल्याचे नमूद केले आहे. नद्यांचे बदलले प्रवाह हे नेपाळ आणि तिबेटच्या सीमेजवळ असल्याने नद्यांचे प्रवाह बदलून नेपाळचा भूभाग बळकावण्याचा चीनचा कट असल्याचे संकेत या अहवालामध्ये दिले आहेत.