प्रतिनिधी / सातारा
झी मराठी या वाहिनीवर फेमस असलेली धारवाहिक मालिका मिसेस मुख्यमंत्री ही कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे बंद होती. चित्रीकरण थांबवण्यात आले होते. आता तब्बल तीन महिन्यांनी पूर्ण नियम पाळून जावली तालुक्यातील प्रभूचीवाडी येथे चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे.
३ महिन्यांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर कोरोना च्या पार्श्वभूमीवर दि.२८ जून रोजी सातारा जिल्ह्यात प्रभूचीवाडी येथे झी मराठीवरील वज्र प्रोडक्शन निर्मित मिसेस मुख्यमंत्री या मालिकेच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली. यावेळी निर्मात्या श्वेता शिंदे, संजय खांबे, दिग्दर्शक हरीश शिर्के सर्व कलाकार आणि तंत्रज्ञ उपस्थित होते. शासनाने आखून दिलेले सर्व नियम आणि निकष पाळूनच या चित्रीकरणाला सुरुवात करण्यात आली.
त्या आधी सर्व जागा निर्जंतुक करण्यात आली. चित्रीकरण स्थळी येणाऱ्या प्रत्येकाला पूर्ण सॅनिटाईझ केले गेले. ठिकठिकाणी सॅनिटाईझ स्टँड ठेवले असून युनिट मधील प्रत्येकाला मास्क हॅण्ड ग्लोव्हज देण्यात आले आहेत. मेक अप हेअर आर्टिस्ट आणि सॅनिटाईझ करणारी व्यक्ती यांना पी पी ई कीट दिले गेले आहेत. तसेच चित्रीकरणात सहभागी होणाऱ्या प्रत्येक कलाकार आणि तंत्रज्ञ यांना १४ दिवस होम क्वारंटाईन केले गेले होते. लवकरच या मालिकेचे पुढील भाग आपल्याला बघायला मिळतील असे वज्र प्रोडक्शनच्या वतीने सांगण्यात आले.