माजी नगरसेवक संघटनेच्या भेटीनंतर जिल्हा पालकमंत्र्यांची सूचना
प्रतिनिधी/ बेळगाव
वाढीव घरपट्टी आणि कचरा व्यवस्थापन सर्व्हीसचार्ज आकारणी रद्द करण्या बाबत महापालिकेने कोणताच निर्णय घेतला नाही. वाढीव घरपट्टी आणि सर्व्हीस चार्जची आकारणी सुरूच आहे. त्यामुळे याबाबत तातडीने निर्णय घ्यावा याकरिता माजी नगरसेवक संघटनेच्या वतीने जिल्हा पालकमंत्र्यांची भेट घेऊन पाठपुरावा करण्यात आला. याची दखल घेऊन सर्व्हीस चार्ज आकारणी रद्द करण्याची सूचना जिल्हा पालकमंत्र्यांनी मनपा आयुक्तांना केली.
वाढीव घरपट्टी आणि कचरा व्यवस्थापन सर्व्हीसचार्ज आकारणी रद्द करावी अशा मागणीचे निवेदन देण्यात आले आहे. सदर निवेदन जिल्हा पालकमंत्री, जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांना देण्यात आले होते. वाढीव घरपट्टीचा भुर्दंड नागरीकांना बसत आहे. तसेच लॉकडाऊनच्या काळात कचरा व्यवस्थापन सर्व्हीसचार्जच्या नावाखाली 360 ते 1000 रूपयापर्यंतचा शुल्क आकारण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांवर घरपट्टीचा बोजा वाढला आहे. कोरोनामुळे लॉकडाऊन असल्याने सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. अशातच घरपट्टी वाढ, कचरा व्यवस्थापन सर्व्हीस चार्जची आकारणी आणि महागाई अशा समस्यांना शहरवसीयांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे वाढीव घरपट्टी आणि कचरा व्यवस्थापन शुल्क आकारणी रद्द करावी अशी मागणी करण्यात आली होती. पण याची दखल महापालिका प्रशासन व प्रशासकांनी घेतली नाही. वारंवार पाठपुरावा करूनही याबाबत कोणताच निर्णय घेतला नसल्याने माजी नगरसेवक संघटनेच्या वतीने सोमवारी जिल्हा पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांची भेट घेण्यात आली. तसेच याबाबत तातडीने निर्णय घ्यावा अशी विनंती करण्यात आली. या निवेदनाची दखल घेऊन सदर सर्व्हीस चार्ज आकारणी रद्द करण्याची अशी सूचना यावेळी जिल्हा पालकमंत्र्यांनी महापालिका आयुक्तांना केली.
यावेळी माजी नगरसेवक संघटनेचे ऍड. नागेश सातेरी, दीपक वाघेला, माजी महापौर शिवाजी सुठकर, मालोजी अष्टेकर, सरिता पाटील, माजी उपमहापौर सतिश गौरगोंडा, कल्लाप्पा प्रधान, ऍड. धनराज गवळी, माजी नगरसेवक नेताजी जाधव, संजीव प्रभू, पुष्पा पर्वतराव, अनुश्री देशपांडे, विजय भोसले, राकेश पलंगे आदींसह माजी नगरसेवक उपस्थित होते.