काकती पोलिसांची कारवाई : दोन महिन्यानंतर झाला होता उलगडा
प्रतिनिधी / बेळगाव
सुळगा (हिंडलगा) येथील महिलेच्या खून प्रकरणी सासू-सासऱयासह चौघा जणांना अटक करण्यात आली आहे. काकती पोलिसांनी ही कारवाई केली असून या चौकडीने खुनाची कबुली दिली असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
गीतांजली जोतिबा शहापूरकर (वय 42) रा. ब्रह्मलिंग गल्ली, सुळगा असे त्या महिलेचे नाव आहे. 6 जूनच्या रात्री 10 ते 7 जूनच्या सकाळी 7 या वेळेत गीतांजलीने न्हाणीघरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे भासविण्यात आले होते. यासंबंधी काकती पोलीस स्थानकात आत्महत्या प्रकरणही दाखल करण्यात आले होते.
गीतांजलीचे वडील वासू यादव मायाण्णा (वय 72) रा. कडोली यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गेल्या चार दिवसांपूर्वी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सासरा निंगाप्पा गुंडू शहापूरकर (वय 70), सासू लक्ष्मी निंगाप्पा शहापूरकर (वय 61), दीर उमेश निंगाप्पा शहापूरकर (वय 35), भावजय लता उमेश शहापूरकर (वय 30) सर्व राहणार सुळगा (हिंडलगा) यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
भारतीय महिला फेडरेशनच्या प्रमोदा हजारे यांच्या पुढाकारातून गीतांजलीच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे दाद मागितली होती. काकतीचे पोलीस निरीक्षक राघवेंद्र हळ्ळूर व त्यांच्या सहकाऱयांनी या प्रकरणातील चौघा जणांना अटक करून त्यांची कसून चौकशी केली असून या चौकडीने खुनाची कबुली दिली आहे.
मालमत्तेसाठी व गीतांजलीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला मारहाण करून उशीने नाक-तोंड दाबून तिचा खून करण्यात आला आहे. खुनानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी न्हाणीघरात गीतांजलीचा मृतदेह गळफास लावलेल्या अवस्थेत लटकविण्यात आला होता. अटक करण्यात आलेल्या चौघा जणांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे.
काकतीचे पोलीस निरीक्षक राघवेंद्र हळ्ळूर, पोलीस उपनिरीक्षक अविनाश ए. वाय. व त्यांच्या सहकाऱयांनी ही कारवाई केली आहे. या चौकडीची हिंडलगा येथील मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. सुरुवातीला 174सी (सीआरपीसी) कलमान्वये संशयास्पद मृत्यू प्रकरण असे या प्रकरणाची नोंद करण्यात आली होती. आता भादंवि 323, 302, 506, सहकलम 34 अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करून तपास हाती घेण्यात आला आहे.