प्रतिनिधी/वडूज
येथील डॉ.बी.जे.काटकर हॉस्पिटल हे कोव्हिड-१९ साठी शासनाने अधिग्रहीत करू नये अशी मागणी खटाव तालुक्यातील जनतेच्यावतीने करण्यात आली आहे. याबाबत तालुक्यातील विविध मान्यवरांसह वडूज नगरपंचायतीच्यावतीने लेखी निवेदन आज तालुका प्रशासनाला दिले आहे.
निवेदनावर माजी आमदार प्रभाकर घार्गे, ज्येष्ठ नेते दादासाहेब गोडसे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रा.बंडा गोडसे, जितेंद्र पवार, बाजार समितीचे माजी सभापती अशोकराव गोडसे, सी.एम. पाटील, नंदकुमार गोडसे, धनंजय चव्हाण, नगराध्यक्ष सुनिल गोडसे आदींच्या सह्या आहेत.
या निवेदनात म्हटले आहे की, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी साथ रोग प्रतिबंध कायद्यातील तरतुदीनुसार अधिसुचना निर्गमीत केल्या आहेत. त्यानुसार येथील डॉ. बी.जे.काटकर हे हॉस्पिटल अधिग्रहीत करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. स्थानिक परिस्थिती पाहता खटाव व माण तालुक्यांत अत्यावश्यक सेवेसाठी सुसज्ज व सर्व सोयींनीयुक्त असे दुसरे कोणतेही हॉस्पिटल या दोन तालुक्यांत उपलब्ध नाही. डॉ. काटकर यांच्या हॉस्पिटलमध्ये महिन्यात हृदयविकाराचे १०० रूग्ण दाखल असतात. तसेच अन्य आजारांच्या सुमारे दोन हजार रूग्णांची तपासणी केली जाते. अतितात्काळ उपचारांसाठी कऱ्हाड, सातारा याठिकाणी जावे लागते. खटाव माण तालुक्यातील लोकांना आरोग्य विषयक सेवा, सुविधा डॉ. काटकर यांच्या हॉस्पिटलमुळे मिळण्यास सुलभ झाली आहे. त्यामुळे शासनाने या हॉस्पिटलचे अधिग्रहण करू नये. कोविडचा विचार करता मायणी येथे ३५० बेडचे सुसज्ज मेडीकल कॉलेज उपलब्ध आहे.
हे निवेदन देताना पृथ्वीराज गोडसे, सचिनशेठ माळी, नगरसेवक वचनशेठ शहा, विपूल गोडसे, डॉ. संतोष गोडसे, प्रदिप खुडे, राजेंद्र कुंभार, अमोल वाघमारे, बाळासाहेब पोळ, बाबा फडतरे आदी उपस्थित होते.