कळंवडे गावातील प्रकार, बाप-लेकाविरोधात गुन्हा दाखल
चिपळूण
पतीस शिवीगाळ व मारहाण करत असताना पत्नीने याचे कारण विचारल्याने महिलेच्या डोक्यात कोयत्याने वार केल्याची खळबळजनक घटना तालुक्यातील कळंवडे-बौध्दवाडी येथे शनिवारी घडली. या हल्ल्यात ही महिला गंभीर जखमी झाली. या प्रकरणी बाप-लेकाविरोधात पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सिध्दार्थ गणपत जाधव व शुभम सिध्दार्थ जाधव (दोघेही कळवंडे-बौध्दवाडी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. या बाबतची फिर्याद सुगंधा सह्याद्री पवार (30, कळंवडे-बौध्दवाडी) यांनी दिली. मिळालेल्या माहितीनुसार, सिध्दार्थ व शुभम जाधव हे दारु पिऊन व हातात कोयता घेऊन सुगंधा पवार यांच्या घरी त्यांचे पती सह्याद्री पांडुरंग पवार यांना मारहाण करण्यासाठी शनिवारी रात्री 10 च्या सुमारास गेले होते. त्यावेळी सिध्दार्थ व शुभम जाधव यांनी सह्यादी पवार यांना धक्काबुक्की करीत असताना सुगंधा पवार यांनी ‘माझ्या पतीला का मारता’ अशी विचारणा करुन पतीस सोडवण्यासाठी गेल्या. त्याचवेळी सिध्दार्थने आपल्या हातातील कोयतीने सुगंधा पवार यांच्या डोक्याच्या उजव्या बाजूस वार केला, तर शुभम याने त्यांना शिवीगाळ करत दमदाटी केली. या हल्ल्यात सुगंधा या गंभीर जखमी झाल्या आहेत. या प्रकरणी त्यांनी पोलीस स्थानकात तक्रार दिली. त्यानुसार या सिध्दार्थ व शुभम जाधव या बाप-लेकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल मोहिते करीत आहेत.