कोकण रेल्वेचे अभियांत्रिकी कौशल्य
प्रतिनिधी/ रत्नागिरी
भारत सरकारच्या ’मेक इन इंडिया’ प्रकल्पा अंतर्गत कोकण रेल्वेच्या अभियांत्रिकी कौशल्यातून तयार झालेल्या डेमू ट्रेन नेपाळला देण्यात आल्या आहेत. या गाडय़ा भारतातील जयनगर (बिहार) तसेच नेपाळमधील जनकपूर जिह्यातील कुर्था स्थानकादरम्यान धावणार आहेत. त्यामुळे कोकण रेल्वेच्या अभियांत्रिकी कौशल्याची झलक आता नेपाळवासीयांना अनुभवायाला मिळणार आहे.
गेल्या वर्षी नेपाळ सरकारशी करार झाला होता. त्यानुसार स्वदेशी बनावटीच्या दोन अत्याधुनिक डेमू ट्रेन बाबत या संदर्भातील करारावर मे 2019 मध्ये सह्या झाल्या होत्या. त्यानुसार 1600 हॉर्स पॉवर क्षमतेच्या या अत्याधुनिक डेमू ट्रेन चेन्नई येथील ’इंटेग्रल कोच पॅक्टरी’ मध्ये (आयसीएफ) तयार करण्यात आल्या. रेल्वे प्रवाशांसाठी अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असलेल्या या दोन डेमू ट्रेनमध्ये प्रत्येकी एक डिझेल पॉवर कार, एक डिझेल ट्रेलर कार तसेच तीन ट्रेलर कारचा समावेश आहे.
यामध्ये एका वातानुकूलित कोचचा देखील समवेश आहे. कोकण रेल्वेकडून नेपाळला सोपविण्यात आलेल्या या दोन डेमू ट्रेन संपूर्ण भारतीय तंत्रज्ञान वापरुन बनविण्यात आल्या आहेत. या संदर्भात नेपाळ सरकारच्या रेल्वे मंत्रालयाशी 52.46 कोटी रुपयांचा करार झाला होता. 18 सप्टेंबरला या गाडय़ा नेपाळकडे सोपवण्यात आल्या. भारत सरकारच्या ’मेक इन इंडिया – मेक फॉर वर्ल्ड’ या मिशन अंतर्गत हा प्रकल्प आहे.