आरआरच्या फलंदाजी क्रमवारीत बदल होण्याची अपेक्षा
वृत्तसंस्था/ अबु धाबी
बलाढय़ मुंबई इंडियन्सविरुद्ध मंगळवारी होणाऱया आयपीएलमधील सामन्यात राजस्थान रॉयल्सला संघात असलेल्या भारतीय खेळाडूंच्या लाईनअपमध्ये अल्पसा बदल करून विजयपथावर येण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. सायंकाळी 7.30 पासून या सामन्याला सुरुवात होईल.
शारजामधील फलंदाजीस अनुकूल असलेल्या खेळपट्टीवर राजस्थान रॉयल्सने झोकात विजयी सलामी दिली होती. पण त्यानंतर अबु धाबी व दुबई यासारख्या मोठय़ा मैदानावर त्यांचा फॉर्म एकदम घसरला आणि पहिल्या दोन सामन्यांत चमकदार प्रदर्शन केलेल्या त्यांच्या फलंदाजांना त्याच्या निम्म्याइतकीही कामगिरी नंतरच्या सामन्यांत त्यांना करता आली नाही. ‘स्पर्धेची सुरुवात चांगली झाली होती. पण शेवटच्या दोन सामन्यात आमच्याकडून योजनेनुसार कामगिरी होऊ शकली नाही. पण टी-20 हा प्रकारच असा आहे की, त्यात केव्हाही काहीही होऊ शकते. मागील दोन्ही सामन्यांत प्रतिस्पर्ध्यांनी आम्हाला सर्वच विभागात मागे टाकले,’ अशी कबुली राजस्थानचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने दिली. मागील दोन सामन्यात माझ्याकडूनही धावा झाल्या नाहीत. या सामन्यात त्याची भरपाई करू शकेन, अशी मला आशा वाटते, असेही तो म्हणाला.
याउलट मुंबई इंडियन्सने गेल्या दोन सामन्यात जबरदस्त प्रदर्शन केले असून सरस धावगतीच्या आधारे दिल्ली कॅपिटल्सला मागे टाकत त्यांनी गुणतक्त्यात आघाडीचे स्थानही घेतले आहे. दोन्ही संघांचे 6 गुण झाले आहेत. आरसीबीविरुद्ध सुपरओव्हरमध्ये निसटता पराभव झाल्यानंतर मुंबईने नंतर जोरदार मुसंडी मारली आणि किंग्स इलेव्हन पंजाब व सनरायजर्स हैदराबादवर 48 व 34 धावांनी विजय मिळविले. मुंबईची सर्वच विभागात चांगली कामगिरी झाली असून कर्णधार रोहित शर्मा (176) चांगल्या फॉर्ममध्ये आहे तर आता डी कॉकलाही सूर गवसला आहे. पोलार्डने सातत्य दाखविले असून इशान किशनही भक्कम फलंदाजी करतोय आणि हार्दिक पंडय़ा फिनिशिंगचे काम करीत आहे. मागील सामन्यात हार्दिकचा भाऊ कृणालनेही चमक दाखविली आहे. गोलंदाजीत पॅटिन्सनने (7 बळी) भरीव योगदान दिले असून बुमराह व बोल्टला त्याने उत्तम साथ दिली आहे. हार्दिकने गोलंदाजी सुरू केल्यास त्यांचे उत्तम कॉम्बिनेशन होऊ शकते.
बेन स्टोक्स राजस्थान संघात दाखल झाला आहे. पण तो सध्या क्वारंटाईनमध्ये असल्याने हा कालावधी संपण्याआधी त्यांना संघाची घसरण थांबवावी लागणार आहे. स्टोक्स 11 ऑक्टोबरपासून उपलब्ध होणार आहे. जोस बटलरचा खराब फॉर्म (3 सामन्यात 47 धावा) हे त्यांच्या घसरणीचे एक कारण आहे. याशिवाय गोलंदाजीत जयदेव उनादकटचे (4 सामन्यात 1 बळी) प्रदर्शन निष्प्रभ झाले आहे. तसेच युवा ऑफस्पिनर रियान परागही गेल्या वर्षीप्रमाणे पूर्णतः निष्प्रभ ठरला आहे. त्यामुळे कर्णधार स्मिथ परागला वगळून त्याच्या जागी यशस्वी जैस्वालला संधी देण्याबाबत विचार करण्याची शक्यता आहे. स्मिथने काही बदल करणार असल्याचे सूचितही केले आहे. उनादकटला आपली भूमिका निश्चित समजली नसल्याने तो पॉवरप्ले किंवा डेथ ओव्हर्समध्ये चांगली कामगिरी करू शकलेला नाही. त्यामुळे टॉम करण व आर्चरवर जादा काम पडले आहे, असे संघाचा मेंटर वॉर्न म्हणतो. कर्णधार स्मिथ अनुभवी वरुण ऍरोन किंवा युवा कार्तिक त्यागी यापैकी एकाला उनादकटच्या जागी संधी देण्याची अपेक्षा केली जात आहे.
संघ : मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा (कर्णधार), तरे, अनमोलप्रीत सिंग, अनुकुल रॉय, लीन, धवल कुलकर्णी, दिग्विजय देशमुख, हार्दिक पंडय़ा, इशान किशन, पॅटिन्सन, बुमराह, जयंत यादव, पोलार्ड, कृणाल पंडय़ा, मॅक्लेनाघन, मोहसिन खान, कोल्टर नाईल, प्रिन्स बलवंत राय, डी कॉक, राहुल चहर, सौरभ तिवारी, रुदरफोर्ड, सूर्यकुमार यादव, बोल्ट.
राजस्थान रॉयल्स : स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), बटलर, स्टोक्स, सॅमसन, टाय, त्यागी, अंकित राजपूत, श्रेयस गोपाल, राहुल तेवातिया, उनादकट, मयांक मार्कंडे, लोमरोर, ओशेन थॉमस, रियान पराग, यशस्वी जैस्वाल, अनुज रावत, आकाश सिंग, मिलर, मनन व्होरा, शशांक सिंग, वरुण ऍरोन, टॉम करण, उथप्पा, अनिरुद्ध जोशी, आर्चर.
सामन्याची वेळ : सायंकाळी 7.30 पासून.
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स.