कोरोना संकटाला तोंड देण्यासाठी मदत : लसनिर्मिती अन् उपचारात वापर
कोरोना महामारीला तोंड देणाऱया विकसनशील देशांच्या मदतीसाठी जागतिक बँक सरसावली आहे. जागतिक बँकेने विकसनशील देशांना मदतीदाखल 12 अब्ज डॉलर्स (सुमारे 88 हजार कोटी रुपये) चा निधी मंजूर केला आहे. ही रक्कम लस खरेदी, निर्मिती आणि कोरोनाबाधितांवरील उपचारासाठी वापरली जाणार आहे. जागतिक बँकेच्या कार्यकारी संचालकांच्या बैठकीत मंगळवारी यासंबंधी निर्णय घेण्यात आला आहे. जागतिक बँकेने 100 कोटी लोकांच्या लसीकरण मोहिमेला सहाय्य करण्याची घोषणा देखील केली आहे.
हा आर्थिक कार्यक्रम जगातील गरजू देशांच्या मदतीसाठी सुरू करण्यात आला आहे. कोरोनापासून बचावासाठी कमी सुविधा असलेल्या देशांना विषाणू फैलावण्यापासून रोखण्यासाठी हा कार्यक्रम मदतीचा ठरणार आहे. गरीब देशांना वैद्यकीय उपकरणांची खरेदी आणि आरोग्य सेवा सुधारण्यास मदत मिळणार आहे. अशा देशांना तज्ञांचा सल्ला पुरविला जाणार असून धोरणनिर्मिती करण्यासही मदत केली जाणार असल्याची माहिती जागतिक बँकेचे अध्यक्ष डेव्हिड मलपास यांनी दिली आहे.
सर्व देशांपर्यंत लस पोहोचणे आवश्यक
कोरोना संकटाला सामोरे जाण्यासाठी सर्व देशांपर्यंत किफायतशीर आणि प्रभावी लस पोहोचविणे आवश्यक आहे. या लसीची वितरण यंत्रणा मजबूत असायला हवी. जगातील अनेक देशांमध्ये महामारीमुळे अर्थव्यवस्था प्रभावित झाली आहे, आर्थिक नुकसान झाले आहे. अद्याप लस तयार झालेली नाही, परंतु वितरण सर्व देशांमध्ये योग्य पद्धतीने व्हावे याकरता आतापासूनच तयारी सुरू करावी लागणार आहे. महामारी रोखण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर लसीकरण सुरू करावे लागणार आहे. संसर्गापासून होणाऱया अन्य आजारांना रोखण्यासाठीही पावले उचलावी लागणार असल्याचे मलपास म्हणाले.
भारताला आर्थिक मदत
कोरोना प्रतिबंधासाठी जागतिक बँकेने यापूर्वी देखील भारताला भरीव मदत केली आहे. जागतिक बँकेने यंदा भारताला 5.13 अब्ज डॉलर्सचे कर्ज जुलै 2019 ते जून 2020 या आर्थिक वर्षादरम्यान प्रदान केले आहे. जागतिक बँकेकडून भारताला मिळालेल्या कर्जाचा हा आकडा चालू दशकातील सर्वाधिक आहे. यात कोरोना महामारीसाठी तीन महिन्यांमध्ये देण्यात आलेले 2.75 अब्ज डॉलर्स सामील आहेत. मे महिन्यात जागतिक बँकेने भारताला 1 अब्ज डॉलर्सचे सामाजिक सुरक्षा पॅकेज देण्याची घोषणा केली होती.