सिद्धापूर तालुक्यातील घटना : मृत हुबळीचे
प्रतिनिधी / कारवार
ओढय़ात कार उलटून चौघांचा मृत्यू झाला आहे. ही घटना गुरुवारी उघडकीस आली असून सिद्धापूर तालुक्यातील कोडनमने येथे बुधवारी घडली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. अक्षता निश्चल, सुष्मा, रोशन अशी मृतांची नावे आहेत. मृतामध्ये 25 ते 30 वयोगटातील दोन युवकांचा आणि दोन युवतींचा समावेश आहे. धारवाड पासिंगची कार गुरुवारी कोडनमने ओढय़ात आढळून आली असता कारमध्ये तीन मृतदेह आढळून आले असून एकाचा मृतदेहाचा शोधकार्य सुरू आहे. स्थानिकांनी कार आणि मृतदेह बाहेर काढले आहेत. कार ओढय़ात पलटी होऊन पाण्याच्या प्रवाहाबरोबर शंभर फूट वाहून गेली होती.
हुबळी येथील दोन युवक आणि दोन युवती अघनाशिनी नदीवरील उचळ्ळी धबधब्याला भेट देऊन घरी परतताना ही घटना घडली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मृत्यू झालेल्या अज्ञातांची ओळख पटविण्यासाठी सिद्धापूर पोलीस प्रयत्नशील आहेत, अशी माहिती शिर्सी डीवायएसपी जी. टी. नायक यांनी दिली. घटनास्थळी बुधवारी जोरदार पाऊस होता. त्यामुळे या घटनेचे कोणीही प्रत्यक्षदर्शी नाहीत, असेही सांगण्यात आले.