प्रतिनिधी / मुंबई, कोल्हापूर
मराठा आरक्षणप्रश्नी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यात बुधवार 2 डिसेंबर रोजी महत्वपूर्ण बैठक होणार आहे. मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान वर्षा बंगल्यावर दुपारी चार वाजता होणाऱ्या या बैठकीला मंत्रिमंडळाच्या मराठा आरक्षणविषयक उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यासह मराठा संघटनांचे समन्वयक, अभ्यासकही उपस्थित राहणार आहेत.
मराठा समाजासाठी असणारे एसईबीसी आरक्षण थांबवून राज्य शासनाने 25 नोव्हेंबरपासून अकरावीसह इतर शैक्षणिक प्रवेशाची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे मराठा समाजातील विद्यार्थ्यांना एसईबीसी आरक्षणाला मुकावे लागले आहे. त्याचा परिणाम सवलत मिळण्यावरही होणार आहे. त्याचबरोबर राज्य शासन एसईबीसी आरक्षण वगळून शासकीय नोकर भरती सुरू करण्याच्या दृष्टीने पावले टाकत असल्याचीही चर्चा आहे. यामुळे मराठा समाजासह मराठा संघटनांमध्ये रोष निर्माण झाला आहे. 8 डिसेंबरला विधानभवनावर धडक मोर्चा काढण्याचा निर्णय मराठा क्रांती मोर्चासह इतर मराठा संघटनांनी रविवारी पुण्यातील बैठकीत जाहीर केला आहे. त्यामुळे आगामी काळात मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा उचल खाण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर ओबीसी संघटनांनीही आंदोलनाचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या निर्णयाकडे साऱयांच्या नजरा लागल्या आहेत.
मुख्यमंत्री ठाकरे आणि संभाजीराजे यांच्यात बैठक
अकरावीसह इतर शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया राबविताना मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी सुपर न्यूमररी पद्धतीने जागांची संख्या वाढविण्यात यावी, अशी मागणी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. पण शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याचे जाहीर करत असताना राज्य शासनाने त्याकडे दुर्लक्ष झाल्याचे स्पष्ट झाले आहे. बुधवारच्या बैठकीत शैक्षणिक प्रवेश देताना सुपर न्यूमररी पद्धतीने एसईबीसीमधील मराठा विद्यार्थ्यांचा कशा पद्धतीने समावेश करता येईल, यावर सविस्तर चर्चा होणार आहे. यावेळी मराठा आरक्षण विषयक उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाणही उपस्थित राहणार आहेत.
शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेत एसईबीसीतील मराठा विद्यार्थ्यांचा सुपर न्यूमररी पद्धतीत कशा पद्धतीने करता येईल, याची स्पष्टता करण्यासाठी बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबरोबर बैठक आहे. यामध्ये मराठा समाजाच्या इतर प्रश्नांवरही चर्चा अपेक्षित आहे. – खासदार संभाजीराजे छत्रपती