रिबनच्या मदतीने जोडले आयुष्यभराचे नाते
अमेरिकेच्या कॅलिफोर्नियाच्या जोडप्याने विलगीकरणात असतानाच विवाह केला आहे. आंटेरियो येथील रहिवासी पॅट्रिक डेलगोडो आणि लॉरेन यांनी विवाहासाठी विशेष तयारी केली होती. परंतु विवाहाच्या तीन दिवसांपूर्वी लॉरेन कोरोनापॉझिटिव्ह असल्याचे समजले. पॅट्रिकने अशा स्थितीत हार न मानता लॉरेन विलगीकरणात असतानाही तिच्याशी विवाह केला आहे.
विवाहादरम्यान वधू पहिल्या मजल्यावर खिडकीत बसली तर वर खाली उभा राहिला. दोघांनीही परस्परांना 32 फूट लांबीच्या रिबनद्वारे परस्परांना बांधून ठेवले होते. याच्याच मदतीने रिंग एक्सचेंज सोहळा पार पडला आहे. यापूर्वीही दोघांचा विवाह अनेकदा लांबणीवर पडला होता. याचमुळे यावेळी ते हा सोहळा टाळू इच्छित नव्हते. या विवाहसोहळय़ाला 40 अतिथींना निमंत्रण देण्यात आले होते, यातील 10 जणांनी सोहळय़ाला हजेरी लावली, तर उर्वरित 30 जणांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत कारमधून बसून सोहळा अनुभवला आहे.
मे 2019 मध्ये या जोडप्याचा साखरपुडा पार पडला होता. या अनोख्या विवाह सोहळय़ाचे आता समाजमाध्यमांवर कौतुक होत आहे. खिडकीत वधू म्हणून बसल्यावर मी परी असल्याचेच वाटले होते असे उद्गार लॉरेनने काढले आहेत.