प्रवाशी दुपारपासून रात्रीपर्यंत विमानतळावर ताटकळत
प्रतिनिधी / बेळगाव
बेळगाव ते बेंगळूर असा प्रवास करणाऱया अलायन्स एअरच्या विमानाला तांत्रिक बिघाडामुळे उशीर झाल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. तब्बल 8 तास उशिराने बेळगावमधून हे विमान बेंगळूरला मार्गस्थ झाले. यामुळे प्रवाशांना दुपारपासून रात्रीपर्यंत सांबरा विमानतळावर ताटकळत राहावे लागले. यामुळे ज्या प्रवाशांना वेळेत पोहोचायचे होते त्यांची मात्र तारांबळ उडाली.
अलायन्स एअरचे विमान मंगळवारी दुपारी 12.55 वा. बेळगाववरून बेंगळूरला रवाना होणार होते. तांत्रिक बिघाड झाल्याने हे विमान विलंबाने दाखल होणार होते. परंतु रात्रीपर्यंत विमान दाखल न झाल्यामुळे प्रवाशांची घालमेल वाढली होती. रात्री उशिरा 8.55 वा. तब्बल 8 तास उशिराने बेंगळूरला रवाना झाले. दुपारी 2 वाजता बेंगळूरला पोहोचणारे विमान तांत्रिक बिघाडामुळे रात्री 10.20 वाजता बेंगळूरला पोहोचले.
कनेक्टिंग विमान निघून गेल्याने अनेकांना आर्थिक फटका
विमानाने 8 तास उशिराने उड्डाण घेतल्यामुळे प्रवाशांमधून संताप व्यक्त होत होता. पुढच्या प्रवासाचे नियोजन करून अनेकांनी या विमानाचे बुकिंग केले होते. वेळेत विमान दाखल न झाल्यामुळे त्याचा फटका प्रवाशांना बसला. नियोजित कनेक्टिंग विमान निघून गेल्याने अनेकांना आर्थिक फटकाही बसला. त्यामुळे असे प्रकार पुन्हा घडणार नाहीत, याची खबरदारी कंपन्यांनी घेणे गरजेचे असल्याचे मत प्रवासी व्यक्त करीत होते.