कोंडुसकोप्प येथील घटना : अगसगे येथील जवानाकडून कृत्य
प्रतिनिधी / बेळगाव
केवळ दहा महिन्यांपूर्वी विवाह झालेल्या एका तरुणाने दारूच्या नशेत सासू, सासरा आणि पत्नीवर विळय़ाने हल्ला केल्याची घटना केंडुसकोप्प येथे मंगळवारी रात्री घडली आहे. या घटनेमध्ये सासू गंभीर जखमी झाली असून तिच्यावर उपचार करण्यात येत आहेत.
हेमंतकुमार विठ्ठल रंगाणी (वय 26, रा. अगसगे) असे हल्ला केलेल्या जवानाचे नाव आहे. हेमंतकुमार याचा विवाह दहा महिन्यांपूर्वी दीपा लक्ष्मण देसाई हिच्याशी झाला. त्यानंतर तो वारंवार तिला त्रास देत होता. याबाबत तिने हेमंतकुमार याच्या आई-वडिलांना माहिती दिली होती. मात्र, त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. किरकोळ कारणातून वारंवार त्रास करत होता. त्यानंतर तो सेवेत रुजू झाल्यामुळे दीपा माहेरी आली होती.
हेमंतकुमार हा काही दिवसांपूर्वी सुटीवर आला आहे. मंगळवारी रात्री 1.30 च्या सुमारास तो कोंडुसकोप्पला गेला. पत्नी दीपाला माझ्या सोबत आता पाठवा, असे सांगू लागला. यावेळी तो दारूच्या नशेत होता. त्यामुळे दीपाच्या कुटुंबीयांनी व शेजाऱयांनी सकाळी पाठवून देतो, तुम्ही येथून जा, असे सांगितले. यावरून वादावादी झाली. त्यामुळे तेथीलच विळा घेऊन त्याने सासूवर हल्ला केला. यावेळी सासरे लक्ष्मण पुढे आले. त्यांच्यावरही त्याने विळय़ाने हल्ला केला.