लोकअदालतमध्ये लागला खटल्याचा निकाल
प्रतिनिधी/ बेळगाव
अपघातात मृत्यू झालेल्या हवालदाराच्या कुटुंबीयांना 63 लाख 47 हजार रुपये देण्याचे आदेश कायदा सेवा प्राधिकारने आयोजित केलेल्या लोकअदालतमध्ये देण्यात आले. त्या ठिकाणी वादी आणि प्रतिवादी यांना समोरासमोर बसवून हा निकाल देण्यात आला. त्यानंतर तातडीने हवालदाराच्या कुटुंबीयांना सदर रकमेचा धनादेश देण्यात आला आहे. या खटल्यात फिर्यादीच्यावतीने ऍड. दिनकर शेट्टी यांनी काम पाहिले. पहिल्यांदाच लोकअदालतमध्ये इतकी मोठी रक्कम देण्याचा आदेश दिला असल्याचे सांगण्यात आले.
राष्ट्रीय महामार्गावरील भुतरामट्टीजवळ बोलेनो कारने बेळगावकडे येणाऱया दुचाकीला धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वार हालाप्पा यल्लाप्पा चंडकी यांचा जागीच मृत्यू झाला होता. 25 जून 2020 रोजी ही घटना घडली होती. हवालदार असलेले हालाप्पा हे बेळगावकडे येताना ही घटना घडली होती. यानंतर कार चालकावर काकती पोलीस स्थानकात फिर्याद दाखल करण्यात आली होती.
या खटल्याची सुनावणी जिल्हा सत्र न्यायालयात सुरू होती. मात्र कोरोनामुळे बरेच खटले राष्ट्रीय लोकअदालतमध्ये वर्ग करण्यात आले होते. त्या ठिकाणी या खटल्याची सुनावणी झाली. यावेळी न्यायाधीश लताकुमारी यांनी विमा कंपनीचे व्यवस्थापक शशिकांत हलगेकर यांना तसेच हालाप्पा याचे कुटुंबीय यांच्यामध्ये समेट करून सदर रक्कम नुकसानभरपाई म्हणून देण्यात येण्याचे ठरविण्यात आले. यामध्ये ऍड. दिनकर शेट्टी यांनीही आपले म्हणणे मांडले होते.
लोकअदालतमध्ये समोरासमोर या खटल्याचा निकाल देण्यात आला. मयताच्या कुटुंबीयांना 63 लाख 47 हजार रुपये देण्याचे ठरविण्यात आले. त्यानुसार त्यांच्याकडे धनादेशही सुपूर्द करण्यात आला आहे.