प्रतिनिधी/ कराड
स्वच्छ सर्वेक्षणमध्ये सलग तिसऱया वर्षी हॅटट्रीक साधण्याचा निर्धार केलेल्या येथील नगरपालिकेने वेस्ट टु वेल्थ या धोरणानुसार टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तू बनवण्यास प्रारंभ केला आहे. आरोग्य कर्मचाऱयांनी नुकताच टाकाऊ वस्तूंचा वापर करून हत्तीची प्रतिकृती साकारली आहे. ही प्रतिकृती पालिकेत ठेवण्यात आली असून आरोग्य कर्मचाऱयांच्या कलाकौशल्याचे कौतुक होत आहे.
नगरपालिकेने गतवर्षी हत्ती, मासा, महात्मा गांधीजींची प्रतिमा अशा विविध कलाकृती टाकाऊ वस्तूंपासून बनवल्या होत्या. यावर्षीही पालिकेचे कर्मचारी अशा वस्तू बनवण्यासाठी मेहनत घेत आहेत. नुकतीच गादीचे फोम, लोखंडी सळय़ा, सुतळय़ा, सुप, केरसुणी, झाडू अशा विविध वस्तूंचा वापर करून कर्मचाऱयांनी हत्तीची कलाकृती साकारली आहे. या हत्तीची रंगरंगोटी प्रसाद हापसे यांनी केली आहे. आकर्षकरित्या रंगवलेला हा हत्ती पालिकेच्या प्रवेशद्वारात ठेवण्यात आला आहे.
मुख्याधिकारी रमाकांत डाके, आरोग्य सभापती महेश कांबळे, नोडल ऑफिसर रफीक भालदार, आरोग्य निरीक्षक मिलिंद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ मुकादम मारूती काटरे, अभिजित खवळे, संभाजी भिसे, राहुल गायकवाड, सागर सातपुते, अतुल माने, भास्कर काटरे, रोहन महापुरे, अरूण दुपटे, श्रीकांत कांबळे, महादेव बनसोडे, प्रकाश कांबळे, प्रल्हाद कांबळे, रवी काटरे यांच्यासह कर्मचाऱयांनी ही कलाकृती साकारली आहे.
टाकाऊ वस्तूंचा वापर करून आणखी काही कलाकृती बनवण्यात येत आहेत. त्याही लवकरच नागरिकांना पाहावयास मिळणार आहेत.