- देशात 13 ठिकाणी आज पोहोचणार लस
ऑनलाईन टीम / पुणे :
आजपासून सीरम इन्स्टिट्यूने आपल्या कोविड-19 कोरोना वॅक्सिन कोविशील्डचा पुरवठा करण्यास सुरुवात केली आहे. सीरमने तयार केलेल्या कोविशिल्ड लसीचे 3 कंटेनर आज कंपनीतून पहाटे 4.50 वाजता लोहगाव विमानतळाकडे रवाना झाले आहेत. कंपनीच्या मांजरी कार्यालयातून लोहगाव विमानतळापर्यंत विशेष पोलीस बंदोबस्तात हे कंटेनर रवाना झाले. एअरपोर्टहून वॅक्सिनचे डोस देशभरात पाठवण्यात येणार आहेत. देशात प्रत्यक्ष लसीकरणाला 16 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे.
पोलिसांनी सीरम इन्स्टिट्यूटपासून या वाहनाला एअरपोर्टपर्यंत सुरक्षा पुरवली. त्याआधी पोलिसांकडून लस घेऊन जाणाऱ्या या गाडीची पुजाही करण्यात आली. ही लस पुणे एअरपोर्टवरुन कार्गो विमानांद्वारे देशभरात पाठवली जाणार आहे.आज अशाप्रकारची आणखी तीन वाहने लसीचे डोस घेऊन पुणे एअरपोर्टला रवाना होणार आहेत.
काल केंद्र सरकारने कोविशील्ड लसीचे एक कोटी दहा लाख डोस पुरवण्यासाठी सीरम इन्स्टिट्यूटला ऑर्डर दिल्यानंतर सीरम इन्स्टिट्यूटकडून आजपासून ही लस पाठवणे सुरु करण्यात आले आहे.
वाहतुकीसाठी विशेष प्रकारच्या कोल्ड चेन व्हॅन वापरण्यात आल्या आहेत. ही लस दोन ते आठ अंश सेल्सिअस इतक्या तापमानात ठेवणे आवश्यक असल्याने या वाहनांमधून तितके तापमान नियंत्रित करण्यात आले आहे.
पहिल्या टप्प्यात या लसीचा वापर हा प्रामुख्याने कोरोना वॉरियर्ससाठी करण्यात येणार आहे. कंपनीला सुरुवातीला दोन कोटी डॉसची ऑर्डर मिळाली आहे. त्यापैकी 65 लाख डोस देशभरातील विविध राज्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेय.