वृत्तसंस्था / काठमांडू
नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांना स्वतःच्याच पक्षातून हाकलण्यात आले आहे. ओली यांच्या विरोधी गटाचे नेतृत्व करणारे पुष्पकमल दहल उर्फ प्रचंड गटाने पक्षविरोधी कारवायांचे कारण देत हे पाऊल उचलले आहे. सत्तारूढ नेपाळ कम्युनिस्ट पक्षाचे प्रवक्ते नारायण काजी श्रेष्ठ यांनी याची पुष्टी दिली आहे. हा निर्णय पंतप्रधान ओली आणि त्यांच्या समर्थकांच्या अनुपस्थितीत घेण्यात आला आहे.
नेपाळ कम्युनिस्ट पक्षाच्या या बैठकीत ओली गटाचे नेते सामील झाले नव्हते. अशा स्थितीत प्रचंड समर्थक नेत्यांच्या या निर्णयाला मान्य करण्यास ओली नकार देऊ शकतात. पक्षात विरोधी गटाचे नेतृत्व करणारे प्रचंड मागील अनेक महिन्यांपासून आक्रमक झाले आहेत. अशा स्थितीत राजकीय अस्थैर्याच्या उंबरठय़ावर उभ्या असलेला नेपाळ कम्युनिस्ट पक्ष कुठल्याही क्षणी दोन गटांमध्ये विभागला जाणार आहे.