वर्षअखेरपर्यंत लसनिर्मिती शक्य- सध्या चार लसींवर काम
कोची / वृत्तसंस्था
देशात लसीकरण मोहीम सुरू असली तरी लहान मुलांसाठी अद्याप कोरोना प्रतिबंधक लस देण्यास सुरुवात झालेली नाही. कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या लसींचा वापर सध्या कोरोनायोद्धय़ांसाठी सुरू असला तरी येत्या ऑक्टोबर 2021 पर्यंत मुलांसाठी कोविड-19 प्रतिबंधक लस तयार होईल, अशी माहिती ‘सीरम’ या औषधनिर्मिती कंपनीने दिली आहे. सदर लस नवजात बालकांना जन्मतः दिली जाऊ शकते, अशी माहिती उपलब्ध झाली आहे.
कोव्हिशिल्ड लस तयार करणाऱया सीरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियाचे (एसआयआय) ग्रुप एक्झिम, डायरेक्टर पी. सी. नंबियार यांनी रविवारी मुलांसाठीच्या कोरोना प्रतिबंधक लसीबाबत माहिती दिली. सीरम कंपनी सध्या कोरोना प्रतिबंधक चार लस तयार करीत असून या वर्षाच्या अखेरीस त्या सर्व वापरासाठी तयार असतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. नवजात बालकांबरोबरच अन्य मुलांसाठीही या लसीचा वापर करण्याबाबत चाचण्या घेण्यात येतील. चाचण्यांना योग्य प्रतिसाद मिळाल्यास सदर लस मुलांसाठी औषध म्हणून विकसित केली जाईल, असे नंबियार यांनी स्पष्ट केले. केरळमधील कोची येथे एका कार्यक्रमात संबोधित करताना नंबियार यांनी ही माहिती दिली. ‘सीरम’ तयार करत असलेली नोव्होव्हॅक्स लस जूनपर्यंत तयार होणार असल्याचेही नंबियार यांनी सांगितले.
कोरोना संसर्गामुळे आतापर्यंत देशात दीड लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाल्यानंतर आता कोव्हॅक्सिन आणि कोव्हिशिल्ड या लसींच्या माध्यमातून लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. या लसीकरणामुळे कोरोना संसर्ग नियंत्रणात येईल अशी आशा आहे. मात्र, सदर लसी ठराविक वयोगटासाठी वापरण्यात येत आहेत.