त्रिपुराचे मुख्यमंत्री बरळले – काँग्रेस-माकपने नोंदविला आक्षेप
वृत्तसंस्था/ अगरतळा
स्वतःच्या बेताल विधानांसाठी चर्चेत राहणारे त्रिपुराचे मुख्यमंत्री विप्लव कुमार देव पुन्हा एकदा प्रकाशझोतात आले आहेत. भाजप नेपाळ आणि श्रीलंकेतही सरकार स्थापन करू इच्छित असल्याचा दावा विप्लव यांनी केला आहे. त्यांच्या या विधानामुळे वाद निर्माण झाला आहे.
भाजप अध्यक्ष असताना अमित शाह यांनी पक्ष स्वतःची व्याप्ती वाढवू इच्छित असल्याचे आणि नेपाळ तसेच श्रीलंकेत सरकार सत्तेवर आणण्याची योजना आखत असल्याचे आम्हाला सांगितले होते. अमित शाह यांनी राज्य अतिथीगृहात आयोजित कार्यकर्त्यांच्या बैठकीत हे विधान केले होते असा दावा विप्लव यांनी केला आहे.
केंद्राचा अर्थसंकल्प म्हणजे आत्मनिर्भर दक्षिण आशियाच्या निर्मितीच्या दिशेने पाऊल आहे. भारताचे धोरण आणि कृती बांगलादेश, भूतान आणि नेपाळला आत्मनिर्भर करण्यास सक्षम असल्याचे उद्गार विप्लव यांनी काढले आहेत.
विधानाच्या चौकशीची मागणी
विप्लव यांचे विधान नेपाळ आणि श्रीलंकेसारख्या सार्वभौम देशांच्या विरोधात आहे. या देशांची सत्ता प्राप्त करण्याच्या योजनेसंबंधीच्या या विधानाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी काँग्रेस आणि माकपने केली आहे.