बेंगळूर/प्रतिनिधी
दिल्लीच्या कोर्टाने शुक्रवारी टूलकिट प्रकरणात अटक केलेल्या पर्यावरणवादी कार्यकर्त्या दिशा रवी यांना तीन दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली आहे.
दरम्यान रविला पटियाला हाऊस कोर्टासमोर हजर केले असता दिल्ली पोलिसांनी तिला या प्रकरणात पोलीस कोठडी मागितली होती परंतु न्यायालयाने तिला न्यायालयीन कोठडी सुनावली. याआधी न्यायालयाने दिशाला ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. कोठडीची मुदत संपताच दिल्ली पोलिसांनी ३ दिवसांची पोलीस कोठडी वाढवून मागितली होती. मात्र, न्यायालयाने दिशाला ३ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दिल्ली पोलिसांनी शुक्रवारी दिशा रवीला पटियाला न्यायालयात हजर केलं होतं. यावेळी न्यायालयाने पोलीस कोठडीची मागणी फेटाळून लावली.
न्यायालयासमोर दिशाची पोलीस कोठडी वाढवून मागताना दिल्ली पोलिसांनी ‘दिशा चौकशीदरम्यान इतर आरोपींना दोष देत होती. त्यामुळे तिची शंतनु मुळूक सोबत समोरासमोर चौकशी करण्याची गरज आहे. २२ फेब्रुवारी रोजी त्याची चौकशी होणार असून तोपर्यंत दिशाला पोलीस कोठडीतच ठेवण्याची मागणी’ पोलिसांनी न्यायालयाकडे केली होती. मात्र, ही मागणी फेटाळून लावण्यात आली.