एमबीबीएसमध्ये राज्यात चौथा येण्याचा मिळविला मान
प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगावची कन्या डॉ. नम्रता मारुती देवगेकर या सुवर्णपदकाच्या मानकरी ठरल्या आहेत. नुकत्याच झालेल्या एमबीबीएस परीक्षेत राज्यात चौथा येण्याचा मान त्यांनी मिळविला आहे. दावणगेरी येथील जे. जे. एम. मेडिकल कॉलेज येथे झालेल्या पदवीदान समारंभात त्यांना सुवर्णपदकाने गौरविण्यात आले. बेंगळूर येथील राजीव गांधी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. एस. सच्चिदानंद व प्राचार्य डॉ. मुर्गे यांच्या हस्ते सुवर्णपदक देण्यात आले.
जोशी मळा, खासबाग येथील असणाऱया डॉ. नम्रता यांनी दावणगेरीच्या जे. जे. एम. मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएसचे शिक्षण घेतले आहे. ईएनटी विभागात राज्यात चौथा क्रमांक त्यांनी पटकाविला आहे. त्यांचे प्राथमिक शिक्षण टिळकवाडी येथील डी. पी. स्कूल तर महाविद्यालयीन शिक्षण जीएसएस कॉलेजमध्ये पूर्ण झाले. सीईटी रँकिंगनुसार त्यांना दावणगेरी येथे कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला होता.
नम्रता या दहावी व बारावीत बेळगाव जिल्हय़ात द्वितीय आल्या होत्या. त्यांनी अनेक क्रीडा स्पर्धांमध्येही यश मिळविले आहे. एमबीबीएस पूर्ण करताना थ्रो बॉल, नेट बॉल यामध्येदेखील सुवर्णपदके मिळविली आहेत. यापुढे सीईटी उत्तीर्ण होऊन न्यूरो सर्जन होण्याचे ध्येय त्यांनी बाळगले आहे. बेळगावचे मारुती व भारती देवगेकर यांच्या त्या कन्या आहेत. त्यांना प्रा. डॉ. शिवप्रसाद दंडगी यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले आहे.