गृहमंत्री अमित शाह यांचा तामिळनाडू दौरा- भाजपचे ‘मिशन दक्षिण’
वृत्तसंस्था / कन्याकुमारी
5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने दक्षिणेतही स्वतःला पूर्ण शक्तिनिशी झोकून दिले आहे. केरळ आणि तामिळनाडु या दोन राज्यांमध्येही निवडणूक होणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कन्याकुमारीमध्ये भाजपच्या समर्थनार्थ एक रोड शो रविवारी केला आहे. यादरम्यान शाह यांनी निवडणुकीनंतर अण्णाद्रमुक-भाजप आघाडीचे सरकार सत्तेवर राहणार असल्याचा दावा केला आहे.
शाह यांनी कन्याकुमारीत भाजपच्या डोअर टू डोअर प्रचार मोहिमेची सुरुवात केली आहे. याला विजय संकल्प महासंपर्क अभियान नाव देण्यात आले आहे. तामिळनाडूत भाजपने अण्णाद्रमुकशी आघाडी केली आहे.
कन्याकुमारीच्या सुचिंद्रममध्ये शाह यांनी रोड शोत भाग घेतला आहे. जनसंपर्क मोहिमेदरम्यान शाह यांनी अनेक ठिकाणी लोकांना एक बुकलेट सोपविले आहे. 11 घरांपर्यंत पोहोचून आम्ही घरोघरी प्रचार मोहिमेची सुरुवात केल्याचे शाह यांनी म्हटले आहे.
कन्याकुमारीत पोटनिवडणूक
कन्याकुमारी लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार पी. राधाकृष्णन यांना विजयी करण्याचे आवाहन शाह यांनी केले आहे. तामिळनाडूतील आघाडीच्या अंतर्गत भाजपच्या वाटय़ाला 20 जागा आल्या आहेत. तर कन्याकुमारी लोकसभा पोटनिवडणुकीत आघाडीच्या वतीने भाजपचा उमेदवार आहे.