वृत्तसंस्था/ वेलिंग्टन
मार्टिन गुप्टीलच्या शानदार 71 धावांच्या खेळीच्या जोरावर यजमान न्यूझीलंडने रविवारी येथे ऑस्ट्रेलियाविरूद्धची पाच सामन्यांची टी-20 मालिका 3-2 अशा फरकाने जिंकली. या मालिकेतील शेवटच्या सामन्यात न्यूझीलंडने ऑस्ट्रेलियाचा 7 गडय़ांनी पराभव केला.
पाच सामन्यांच्या या मालिकेत न्यूझीलंडला पहिल्या सलग दोन सामन्यांत पराभव पत्करावा लागला होता पण त्यानंतर न्यूझीलंडने जोरदार मुसंडी मारत पुढील तीन सामने सलग जिंकून या मालिकेतील ऑस्ट्रेलियाचे आव्हान संपुष्टात आणले.
रविवारच्या शेवटच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 8 बाद 142 धावा जमवित न्यूझीलंडला विजयासाठी 143 धावांचे आव्हान दिले. या मालिकेतील पाचव्या आणि निर्णायक सामन्यात न्यूझीलंडने 15.3 षटकांत 3 बाद 143 धावा जमवित हा सामना आणि मालिका जिंकली.
ऑस्ट्रेलियाच्या डावात मॅथ्यु वेडने 29 चेंडूत 2 षटकार आणि 3 चौकारांसह 44, कर्णधार फिंचने 32 चेंडूत 5 चौकार आणि 1 षटकारांसह 36, स्टोनिसने 26 चेंडूत 2 चौकार आणि 1 षटकारांसह 26, मिचेल मार्शने 1 षटकारांसह 10 धावा जमविल्या. ऍगेरने 6, रिचर्डसनने 4 धावा जमविल्या. ऑस्ट्रेलियाच्या डावात 5 षटकार आणि 10 चौकार नोंदविले गेले. न्यूझीलंडतर्फे ईश सोधीने 24 धावांत 3, साऊदीने 38 धावांत 2, बोल्टने 26 धावांत 2 आणि चॅपमनने 9 धावांत 1 गडी बाद केला.
प्रत्त्युरादाखल खेळताना गुप्टील आणि कॉनवे यांनी न्यूझीलंडच्या डावाला दमदार सुरूवात करून दिली. या जोडीने 11.5 षटकांत सलामीच्या गडय़ासाठी 110 धावांची भागिदारी केली. कॉनवेने 28 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारांसह 36 धावा जमविल्या. कर्णधार केन विल्यम्सन खाते उघडण्यापूर्वीच पायचीत झाला. गुप्टीलने 46 चेंडूत 4 षटकार आणि 4 चौकारांसह 71 धावा झळकविल्या. फिलीप्सने 16 चेंडूत 2 षटकार आणि 5 चौकारांसह नाबाद 34 धावा जमविल्या. न्यूझीलंडच्या डावात 7 षटकार आणि 15 चौकार नोंदविले गेले. या शेवटच्या सामन्यात न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी शेवटच्या दहा षटकांत ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना फटकेबाजीपासून रोखल्याने न्यूझीलंडला मालिका जिंकता आली.
संक्षिप्त धावफलक ः ऑस्ट्रेलिया 20 षटकांत 8 बाद 142 (वेड 44, फिंच 36, स्टोनिस 26, मिचेल मार्श 10, जे. रिचर्डसन 4, फिलीप 2, मॅक्सवेल 1, ऍगर 6, सोधी 3-24, साऊदी 2-38, बोल्ट 2-26, चॅपमन 1-9). न्यूझीलंड 15.3 षटकांत 3 बाद 143 (गुप्टील 71, कॉनवे 36, फिलीप्स नाबाद 34, विल्यम्सन 0, चॅपमन नाबाद 1, मेरेडिथ 2-39, जे. रिचर्डसन 1-19).