मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे प्रतिपादन : सहाव्या विज्ञान चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन
प्रतिनिधी / पणजी
विज्ञान गोव्यातील तरूण, प्रतिभावान आणि हुशार मनापर्यंत पोचले पाहिजे आणि आपल्या तरूणांनी अभिनव विचार करण्याची प्रक्रिया सुरु केली पाहिजे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. गोवा विज्ञान चित्रपट महोत्सवाच्या 6 व्या आवृत्तीचे उद्घाटन काल बुधवारी येथील आयनॉक्स मल्टिप्लेक्समध्ये त्यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना त्यांनी वरील प्रतिपादन केले.
गोवा मनोरंजन संस्थेचे उपाध्यक्ष सुभाष फळदेसाई, विज्ञान, तंत्रज्ञान व कचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक लेविन्सन मार्टिन्स, संयोजक निमिश कपूर,
प्राचार्य हरिलाल मेनन, डॉ. एकनाथ चाकुरकर, जयंत सहस्रबुद्धे, शेखर सरदेसाई, विज्ञान चित्रपट महोत्सवाचे संरक्षक, सीएसआयआर-एनआयओचे संचालक डॉ. सुनील कुमार सिंह आणि विज्ञान परिषद, गोवाचे अध्यक्ष सुहास गोडसे यांच्या उपस्थितित करण्यात आले.
कोरोना महामारीमुळे, या वर्षाचा उत्सव मर्यादित आहे. ज्यामध्ये चार विज्ञान विशेष चित्रपट, अभिनव प्रदर्शन, शिक्षकांसाठी कार्यशाळा तसेच फिल्म मेकिंगवरील मास्टर क्लास यांचा समावेश असेल. या सर्व उपक्रमांची सुरूवात विद्यार्थ्यांमधील विज्ञानाच्या संकल्पनांना पोहचविण्याच्या उद्देशाने केली गेली आहे.
युवकांनी विज्ञान संशोधनात रस घ्यावा : मुख्यमंत्री
यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विज्ञान चित्रपट महोत्सव समितीने केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले. या महोत्सवाचा उद्देश विज्ञान चित्रपटांची स्क्रीनिंग करणे आणि विद्यार्थ्यांकडून नाविन्यपूर्ण गोष्टी आणणे हा आहे. विज्ञान गोव्यातील तरूण, प्रतिभावान आणि हुशार मनापर्यंत पोचले पाहिजे आणि आपल्या तरूणांनी अभिनव विचार करण्याची प्रक्रिया सुरु केली पाहिजे. युवा मनांना नाविन्यपूर्णतेने प्रज्वलित केले पाहिजे आणि असे करण्यासाठी संशोधन संस्थांची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे. जर त्यांनी आता या संशोधन संस्थांना भेटी दिल्या तर विज्ञानाची आवड व रस विकसित होईल. म्हणून, ज्ञानाबरोबरच व्यावहारिक अनुभव देखील महत्त्वपूर्ण आहेत. विद्यार्थ्यांनी इच्छुक असलेल्या नाविन्यपूर्ण क्षेत्राला भेट द्यावी आणि मला खात्री आहे की भविष्यातही आम्ही विविध संशोधन क्षेत्रात असे उपक्रम राबविण्यात मदत करू, असे डॉ. सावंत यांनी म्हटले.
पर्रीकरांनी महोत्सवाला प्रोत्साहन दिले : सहस्रबुद्धे
विज्ञान भारतीचे राष्ट्रीय संघटन सचिव, जयंत सहस्रबुद्धे म्हणाले की चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याचा आणि त्यांना विज्ञानाविषयी जागरूक करण्याचा एक उत्तम मार्ग आहे. आमचे माजी मुख्यमंत्री आणि संरक्षणमंत्री स्वर्गीय मनोहर पर्रीकर यांनी या महोत्सवाला प्रोत्साहन दिले. त्यांना देखिल विज्ञान आणि आधुनिक तंत्रज्ञानाची आवड होती आणि गोव्यात त्यांचे विचार आणि विज्ञान प्रसार या महोत्सवा अंतर्गत समाजात पोहोचू शकतो.
देशासाठी काहीतरी नाविन्यपूर्ण करणे आवश्यक : फळदसाई
गोवा मनोरंजन सोसायटीचे उपाध्यक्ष सुभाष फळ देसाई म्हणाले की विद्यार्थ्यांना सहभाग घेण्यास प्रवृत्त करण्याची ही मोठी संधी आहे. अशा महोत्सवाचा एक भाग म्हणून आपण आपल्या देशासाठी काहीतरी नाविन्यपूर्ण करणे आवश्यक आहे आणि मला खात्री आहे की नवीन शैक्षणिक धोरणात नाविन्यपूर्ण आणि संशोधनाच्या क्षेत्रात भारत आघाडीवर आणण्याची दृष्टी आहे.
आपल्या सर्वांनी विज्ञान गांभीर्याने घेण्याची गरज आहे. म्हणूनच प्रत्येकाला वैज्ञानिक ज्ञान उपलब्ध करून देण्याची नितांत गरज आहे, असे सीएसआयआर-एनआयओचे संचालक डॉ. सुनील कुमार सिंह म्हणाले.
महोत्सवाला उपस्थित असलेले मान्यवरांचे स्वागत विज्ञान परिषद, गोवाचे अध्यक्ष सुहास गोडसे यांनी केले.