व्यंग चित्रकार जगदीश कुंटे यांनी मांडले विचार, चित्रकला प्रदर्शनाचे उद्घाटन
प्रतिनिधी / बेळगाव
चित्रकला, डिझाईन हा एक शांत कलेचा नमुना आहे. चित्रकार आपल्या चित्रामधुन व्यक्त होत असतो. आपल्या देशात नाटय़, नृत्य, संगीत या कलांनी उत्तुंग यश मिळविले आहे. आता गरज आहे ती चित्रकारांना व्यासपिठ मिळवून देण्याची. मनुष्याला शालेय जीवनापासूनच कलांची ओळख करून देणे गरजेचे आहे. पाठय़पुस्तकांमध्ये कला हा विषय समाविष्ट केल्यास विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळेल असे विचार तरुण भारतचे व्यंग चित्रकार जगदीश कुंटे यांनी मांडले.
श्री माता ग्लास आर्ट गॅलरी, कर्नाटक ललित कला अकादमी व वर्णकला सांस्कृतिक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या चित्रकला प्रदर्शनाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. व्यासपिठावर सामाजिक कार्यकर्ते साजिद शेख, बेंगळूर येथील ललित कला अकादमीचे सदस्य जयानंद मादार, चित्रकार शिरीष देशपांडे, चित्रकार सचिन उपाध्ये, निवृत्त चित्रकला शिक्षक पी. आय. हुलकुंद, रमेश तेरदाळ, चित्रकार दिलीपकुमार काळे उपस्थित होते. या प्रदर्शनामध्ये बेळगावसह परिसरातील चित्रकारांची 60 हून अधिक चित्रे मांडण्यात आली आहेत. चित्रप्रदर्शनाची सुरूवात दीप प्रज्वलनाने झाली. सुजाता वस्त्रद यांनी स्वागतगीत गायिले, वर्णकला सांस्कृतिक कला संघाचे अध्यक्ष नागेश चिमरोल यांनी प्रास्ताविक केले. सामाजिक कार्यकर्ते साजिद शेख यांनी कला ही दैवी देणगी आहे. याची जोपासना करा असे सांगितले. हे प्रदर्शन दुसरा रेल्वेगेट नजिकच्या के. बी. कुलकर्णी आर्ट गॅलरी (वरेरकर नाटय़ संघ) येथे बरविण्यात आले आहे. 21 मार्च पर्यंत हे प्रदर्शन सकाळी 11 ते सायंकाळी 7 या वेळेत खुले असणार आहे.