ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशात एकीकडे लसीकरणाला वेग आला असतानाच महाराष्ट्र, केरळ, पंजाब आणि मध्यप्रदेशसह काही राज्यात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा झपाट्याने वाढू लागल्याने देशाची चिंता वाढली आहे.
भारतात मागील 24 तासात 43 हजार 846 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 197 रुग्णांचा मृत्यू झाला. देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 1 कोटी 15 लाख 99 हजार 130 वर पोहचली असून, मृतांची एकूण संख्या 1 लाख 59 हजार 755 एवढी आहे. देशात आतापर्यंत पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील 4 कोटी 46 लाख 03 हजार 841 लोकांना लस देण्यात आली आहे.
शनिवारी 22,956 रुग्ण कोरोनामुक्त झाले. आतापर्यंत 1 कोटी 11 लाख 30 हजार 288 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले आहेत. सध्या देशात 3 लाख 09 हजार 087 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
देशात नियंत्रणात आलेला कोरोना पुन्हा एकदा वेगाने फैलावत असल्याने कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना तसेच कोरोना नियमांची कडक अंमलबजावणी करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न सुरू आहे.