बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात तिसऱ्या टप्प्यातील कोरोना लसीकरण सुरु आहे. राज्यात ६० वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी लसीकरण सुरु आहे. तसेच आरोग्यविषयक समस्या असणाऱ्या ४५ वर्षांवरील व्यक्तींनाही लसीकरण करण्यात येत आहे. दरम्यान आज, मंगळवारी जनता दल (सेक्युलर) नेते आणि माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी मंगळवारी कोविड लसीचा पहिला डोस घेतला. कुमारस्वामी ६१ वर्षांचे आहेत. त्यांनी बेंगळूरच्या श्री जयदेवदेव कार्डिओव्हस्कुलर सायन्स आणि रिसर्चमध्ये कोरोना लस घेतली.
राज्यात याआधी अनेक राजकीय नेत्यांनी कोरोना लस घेतली आहे. यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी स्वतः कोरोना लस घेऊन राज्यातील जनतेला लस घेण्याचे आवाहन केले होते. तसेच त्यांनी कोरोना लसीबाबत असणारी शंका मनातून काढून टाकावी असेही ते म्हणाले होते. मुख्यमंत्र्यांनी दोन्ही लसी सुरक्षित असल्याचे म्हंटले होते.