स्पाईस जेटची बेंगळूर विमानसेवा बंद : प्रवाशांमधून तीव्र संताप
प्रतिनिधी / बेळगाव
महिन्याला 30 हजार प्रवासी प्रवास करणाऱया बेळगाव विमानतळावरील एक एक विमानसेवा बंद होऊ लागल्याने प्रवाशांमधून संताप व्यक्त केला जात आहे. अवघ्या आठवडाभरात बेंगळूरची दुसरी विमानफेरी बंद झाली आहे. प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असतानाही स्पाईस जेट कंपनीने 28 मार्चपासून विमानफेरी बंद केली आहे. अचानकपणे विमानफेरी बंद झाल्याने सकाळच्या सत्रात बेंगळूर-बेळगाव-बेंगळूर असा प्रवास करणाऱया प्रवाशांना याचा फटका बसला आहे.
बेंगळूर शहराला यापूर्वी चार विमान कंपन्या सेवा देत होत्या. इंडिगो, स्पाईस जेट, अलायन्स एअर व स्टार एअर या कंपन्या बेळगाव-बेंगळूर-बेळगाव या मार्गावर सेवा देत होत्या. तांत्रिक कारण देत अलायन्स एअरने आठवडाभरापूर्वी बेळगाव-बेंगळूर ही फेरी बंद करत असल्याची घोषणा केली. परंतु अलायन्सने बेळगाव-पुणे ही विमानसेवा मात्र सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
ही सेवा बंद होऊन काही दिवस उलटले असतानाच स्पाईस जेट कंपनीने आपली विमानफेरी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. चांगला प्रतिसाद मिळत असतानाही विमानफेरी बंद का करण्यात आली, असा प्रश्न प्रवाशांमधून विचारण्यात येत आहे.
स्पाईस जेटची सकाळची फेरी असल्याने बेंगळूरवरून येणाऱया प्रवासी, उद्योजक, राजकारणी यांना बेळगावमध्ये येऊन आपले काम करून सायंकाळी पुन्हा बेंगळूरला परतणे सोयीचे ठरत होते. परंतु अचानक ही फेरी रद्द केल्याने प्रवाशांची हेळसांड होणार आहे.
वरिष्ट अधिकाऱयांशी चर्चा करणार
स्पाईस जेट कंपनीने बेंगळूर शहराची फेरी रद्द केली आहे. ती पुन्हा सुरू करण्यासाठी कंपनीच्या वरिष्ट अधिकाऱयांशी चर्चा सुरू आहे. सध्या बेंगळूरला इंडिगो व स्टार एअर या दोन कंपन्या सेवा देत असल्याची माहिती बेळगाव विमानतळाचे संचालक राजेशकुमार मौर्य यांनी तरुण भारतला दिली.