ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का बसला आहे. टीम मधील प्रमुख खेळाडू अष्टपैलू अक्षर पटेलला कोरोनाची लागण झाली आहे. यापूर्वीच दुखापतीमुळे दिल्ली कॅपिटल्सचा नियमित कॅप्टन श्रेयस अय्यर आयपीएल मधून बाहेर पडला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अक्षरला कोरोनाची लागण झाली असून त्याला इतरांपेक्षा वेगळे ठेवण्यात आले आहे. त्याचबरोबर तो सध्या सर्व कोरोना प्रोटोकॉलचे पालन देखील करत आहे. आयपीएल स्पर्धेत कोरोनाची लागण झालेला अक्षर पटेल हा दुसरा खेळाडू आहे.
यापूर्वी कोलकाता नाईट रायडर्स टीमचा बॅट्समन नितीश राणा याला कोरोनाची लागण झाली होती. नितीश राणाने 21 मार्चला मुंबईच्या केकेआरच्या हॉटेलमध्ये प्रवेश केला, तेव्हा तो कोरोनाचा निगेटिव्ह रिपोर्ट घेऊन आला होता. हा रिपोर्ट 19 मार्चचा होता. आयपीएलच्या प्रोटोकॉलनुसार त्याची पुन्हा कोरोना टेस्ट करण्यात आली तेव्हा ती पॉझिटिव्ह आली आहे.
दरम्यान, दिल्ली कॅपिटल्सची पहिली मॅच 10 एप्रिल रोजी चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबईत होणार आहे. या सीजनमध्ये ऋषभ पंत टीमचे नेतृत्व करणार आहे.
तसेच यंदा मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर 10 सामने होणार आहे. या सामन्यांच्या तयारीसाठी 19 कर्मचारी कार्यरत होते. त्यातील 8 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यानंतर आता कोरोनाचा धोका खेळाडूंपर्यंत येऊन पोहचला आहे.