केंद्रीय मंत्री सदानंदगौडा यांची माहिती : कोरोना प्रतिबंधक लस घेण्याचे आवाहन
प्रतिनिधी / बेंगळूर
15 दिवसांच्या आत केंद्र सरकारकडून सर्व सुविधा उपलब्ध होतील. कर्नाटक सरकार कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी योग्यरित्या खबरदारी घेत आहे. तरीही बंगळूरमध्ये कोरोनाबधितांची संख्या वाढतच आहे. रुग्णसंख्येत आणखी वाढ होणार असल्याचे तज्ञांकडून सांगितले जात आहे. त्यामुळे सरकारच्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे, असे केंद्रीय मंत्री सदानंद गौडा यांनी सांगितले. बेंगळुरात पत्रकारांशी ते बोलत होते.
सदानंद गौडा पुढे म्हणाले, सुरुवातीच्या टप्प्यात ऑक्सिजन आणि रेमडेसिवीरची थोडीशी कमतरता होती. दरम्यान, मुख्यमंत्री येडियुराप्पा आणि आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी कमतरता दूर करण्यासाठी केंद्र सरकारवर दबाव आणला होता. त्यामुळे केंद्राने 1.22 लाख रेमडेसिवीर राज्याला पुरविण्यास संमती दर्शविली आहे, असे त्यांनी सांगितले.
केंद्र सरकारकडून कर्नाटकाला 800 मेट्रिक टन ऑक्सिजन पुरविला जात आहे. 30 तारखेपर्यंत 3 लाख लस देण्याची मागणी आम्ही केली असून केंद्राने त्यालाही मान्य केले आहे. तसेच आणखी लस देण्याची मागणी केली आहे. 15 दिवसांच्या आत राज्यात सर्व काही उपलब्ध होईल. राज्यात विकेंड कर्फ्यू यशस्वी झाला आहे. याचा निकाल 10 ते 14 दिवसानंतर कळेल. पुढील 10 दिवस कठीण असून त्यानंतर रुग्णसंख्या कमी होण्याची शक्मयता आहे. कोरोनावर विजय मिळविण्यासाठी प्रत्येकाने कोरोना प्रतिबंधक लस घेतली पाहिजे, असेही ते म्हणाले.